किल्ले संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ बनवा
By admin | Published: March 4, 2015 09:16 PM2015-03-04T21:16:42+5:302015-03-04T23:40:06+5:30
प्रमोद जठार : वित्त व नियोजनमंत्र्यांची घेतली भेट
कणकवली : राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन व देखभाल करण्याकरिता गडकिल्ले संवर्धन महामंडळाची स्थापना करण्याची मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे सोमवारी केली आहे. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, मुंबई भाजप पदाधिकारी सुनील राणे, आदी उपस्थित होते.माजी आमदार जठार यांनी निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गडकिल्ले अस्तित्वात आहेत. या किल्ल्यांच्या सहायाने महाराजांनी परकीय शत्रूंपासून स्वराज्याचे रक्षण केले; परंतु आज त्यांचे जतन करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक किल्ले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातील काही किल्ले केंद्राच्या, तर काही राज्य शासनाच्या अखत्यारित आहेत. दोन्ही शासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)
१00 कोटींची तरतूद करा
राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती व महत्त्व भावी पिढीला समजण्यासाठी तसेच त्याचा अभ्यास करता यावा यासाठी या किल्ल्यांचे योग्य प्रकारे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील सर्व किल्ल्यांचा ताबा महाराष्ट्र सरकारने घेऊन एक स्वतंत्र गडकिल्ले संवर्धन महामंडळ स्थापन करावे. तसेच आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुर्गभ्रमण, दुर्गसाहित्य संमेलन, संवर्धन यासाठी महामंडळास १०० कोटी रूपयांच्या निधीची भरीव तरतूद करावी, असे जठार यांनी निवेदनात म्हटले आहे.