घरात घुसून दागिने लुटणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:40 AM2019-04-22T10:40:00+5:302019-04-22T10:41:34+5:30
तीन दिवसांपूर्वी कोकिसरे बांधवाडी आणि तळेरे परिसरातील घरात घुसून दागिने लुटणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. रेखाचित्राशी साधर्म्य असलेली व्यक्ती आढळून आल्यास किंवा त्याच्याबाबत माहिती मिळाल्यास तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वैभववाडी : तीन दिवसांपूर्वी कोकिसरे बांधवाडी आणि तळेरे परिसरातील घरात घुसून दागिने लुटणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. रेखाचित्राशी साधर्म्य असलेली व्यक्ती आढळून आल्यास किंवा त्याच्याबाबत माहिती मिळाल्यास तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोकिसरे बांधवाडी येथील नारकर दाम्पत्य बुधवारी दुपारच्या सुमारास घरात विश्रांती घेत होते. त्यावेळी हेल्मेटधारी अज्ञाताने घरात घुसून आनंदी नारकर यांच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. भरदिवसा चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. त्यानंतर तळेरे वाघाचीवाडी येथील महिलेकडे पाणी मागून एकजण घरात घुसला.
तेथेही महिलेच्या गळ्यातील दागिना हिसकावताच महिलेने आरडाओरडा केल्यामुळे चोरट्याने तेथून पळ काढला. त्यानंतर तळेरे बाजारपेठेत भाजी विक्रेत्या महिलेच्या हातातील पर्स चोरट्याने हातोहात लांबविली होती. तेथून कासार्डे गावातील घरात घुसून महिलेच्या गळ्यातील दागिने लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्याने केला होता.
एकाच दिवशी चोरट्याने चार ठिकाणी हा प्रकार केल्यामुळे चोरटा हा सराईत असावा असा पोलिसांचा अदांज आहे.
त्यामुळे पोलिसांनी अन्य जिल्ह्यातील हिस्ट्रीशिटरची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय वैभववाडी, तळेरे, परिसरातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.
माहितीनुसार बनविले रेखाचित्र
तळेरे परिसरात ज्या महिलांनी चोरट्याचा चेहरा पाहिला होता त्यानी दिलेल्या माहितीनुसार संशयित लुटारुचे रेखाचित्र तयार केले आहे. हे रेखाचित्र शनिवारी पोलिसांनी प्रसिध्दीसाठी दिले आहे. तशा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास किंवा माहिती मिळाल्यास पोलीस उपनिरीक्षक दीपक शेणवी किंवा वैभववाडी पोलीस स्थानक ०२३६७ :२३७१३३ येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी केले आहे.
अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश नको
सध्या वीज कंपनीकडून होणाऱ्या मीटर रिडींगच्या नावाखाली घरात घुसून दागिने लुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वीज मीटर रिडींगसाठी नेहमीच्या माणसाखेरीज परकी अनोळखी व्यक्ती तसेच पाणी पिण्यासाठी किंवा दागिने पॉलिश करण्यासाठी कोणीही अनोळखी व्यक्ती दारात आल्यास त्याला घरात घेऊ नये, असे आवाहन वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी केले आहे.