लोकसहभागासाठी शाळांमधून ‘स्नेहभोजन’ शिजणार
By admin | Published: September 23, 2015 10:03 PM2015-09-23T22:03:38+5:302015-09-24T00:10:30+5:30
शासनाचा निर्णय : पोषण आहार योजनेला नवा साज चढवण्याचा प्रयत्न
दापोली : लोकसहभागामुळे शिक्षण क्षेत्रात समाजाचा सहभाग वाढेल, विद्यार्थी उपस्थिती वाढण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या वाढीस उपयोगी असणारी पूरक पोषण मूल्ये प्राप्त होतील. आहाराची पौष्टिकता वाढण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अन्न पदार्थ्याची चव चाखता येईल. तसेच सामाजिक बंधुता, एकतेची भावना, सामाजिक बांधिलकी वाढण्यास मदत होईल. या अनुषंगाने शालेय पोषण आहार योजनेत लोकसहभाग वाढवण्यासाठी ‘स्नेहभोजन’ उपक्रम राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. उपक्रम राबविण्यासंबंधी काढण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये या उपक्रमाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये सदर उपक्रम ऐच्छिक स्वरूपाचा राहील. गावातील व्यक्तींचे वाढदिवस, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, जन्मशताब्दी इत्यादी तसेच लग्न समारंभ, राष्ट्रीय सण, स्थानिक पातळीवरील सण इत्यादी बाबी या विशेष दिनाच्या औचित्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. स्नेहभोजन उपक्रमाचे आयोजन शाळेने करावे. त्यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात शाळेने वर्षभराचे नियोजन करावे. यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकारी शाळा व्यवस्थापन समितीला असतील. ग्रामसभा, पालकसभा शाळा व्यवस्थापन समिती सभा यामधून या उपक्रमाची जनजागृती करावी. स्नेहभोजन या आहारामध्ये शालेय पोषण आहारासोबत मिठाई किंंवा पूरक पोषक आहाराचा समावेश करण्यात आला आहे. असा पूरक पोषक आहार विद्यार्थ्यांना नेहमी देण्यात यावा.
स्नेहभोजन उपक्रमांतर्गत कोणत्या तारखेला भोजन देण्यात यावे व भोजनात कोणत्या पदार्थांचा समावेश करणार आहे. याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व वितरकाने एकत्रित निर्णय घ्यावा. या उपक्रमांतर्गत शाळांना रोख रक्कम न देता खाद्य पदार्थ किंंवा आवश्यक इतर साहित्य देता येईल. पोषक आहाराचे वितरण करताना वितरक शाळेमध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. देण्यात येणारा खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्ये तसेच माध्यान्ह भोजनाच्या वेळेतच देण्यात यावे. सदर उपक्रम ज्या आठवड्यात राबविण्यात येईल. त्या आठवड्यात शासनाच्या निर्णयानुसार पूरक आहार देणे आवश्यक राहणार आहे. वितरकाने विशेष दिनाच्या औचित्याने जेवण दिले. त्या दिवशी शालेय पोषण आहार शिजवू नये. परंतु केवळ अल्पोपाहार किंंवा पूरक आहार दिल्यास त्या दिवशी पोषण आहार देणे आवश्यक राहील. स्नेहभोजन उपक्रमामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही, याची दक्षता शाळेने घ्यायची आहे.
तसेच शाळांनी किंवा संबंधितांनी ‘स्नेहभोजन’ उपक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर सभा व बैठकीमध्ये प्रसिध्दी द्यावी. या उपक्रमाची सुरूवात या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. स्नेहभोजन उपक्रमातून शाळा व समाज यांच्यातील संबंध अधिक वृढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा उपक्रम योग्य आहे. (वार्ताहर)
शालेय पोषण आहाराचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले आहे. अनेक शाळांमध्ये अजूनही शालेय पोषण आहार शिजत नाही. त्यामुळे शालेय पोषण आहाराची योजना यशस्वी करण्यासाठी यामध्ये स्थानिक ग्रामस्थांनादेखील सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने ेघेतला आहे. त्यासाठी ‘स्नेहभोजन’ हा उपक्रम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.