तहसील कार्यालय खाली करा
By admin | Published: August 6, 2015 11:46 PM2015-08-06T23:46:18+5:302015-08-06T23:46:18+5:30
राजघराण्याचा आदेश : नवीन करार करण्यास नकार
सावंतवाडी : सावंतवाडीतील नव्या तहसीलदार इमारतीचे काम निधी अभावी बंद पडले असून भाड्याच्या इमारतीत तहसीलदार कार्यालय हलविण्यात आले आहे. त्या इमारतीतूनही तहसीलदार कार्यालय खाली करा, असे पत्र राजघराण्याने तहसीलदार कार्यालयाला पंधरा दिवसांपूर्वी पाठवले आहे. त्यामुळे नवी जागा कोठे शोधायची या विवंचनेत येथील तहसीलदार विभाग सापडला आहे. आणखी काही दिवस करार वाढवा, अशी मागणी राजघराण्याकडे करणार असल्याचे नायब तहसीलदार शशीकांत जाधव यांनी सांगितले. काम सहा महिने थांब याचा प्रत्यय वेळोवेळी सामान्य माणसाला येत असतो. मात्र, इमारत सरकारला भाड्याने द्यायची आणि भाड्याची वाट बघत सहा सहा महिने थांबायची, अशीच वेळ येथील इमारत मालकावर येत आहे. तीन वर्षापूर्वी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाची जुनी इमारत मोडकळीस आल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जुनी इमारत खाली करा व त्या जागेत नवीन इमारत बांधण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यासाठी २ कोटीचा निधीही प्राप्त झाला होता. तसेच तीन वर्षाचा कालावधी देण्यात आला होता.
त्यानुसार तीन वर्षासाठी भाड्याने इमारत शोधून तेथे तहसीलदार कार्यालय हलवण्याबाबत विचार सुरू होता. यासाठी मध्यवर्र्ती जागा निवडावी, असे ठरवण्यात आले. त्यानंतर राजघराण्याला विनंती करून राजवाड्याची एक इमारत मोकळी असून त्या ठिकाणी भाड्याने जागा देण्यात यावी, असे सुचवण्यात आले. त्यानुसार राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी ही इमारत ३६ हजार रूपये महिना भाडा या अटीवर दिली. तसा ३ वर्षाचा करारही करण्यात आला होता. मात्र मध्यंतरी अनेक वेळा महिन्याच्या महिन्याला भाडे देणे सरकारला शक्य होत नव्हते. अनेक वेळा भाडे उशिराने दिले जात होते. इमारतीच्या वापराविषयी त्रुुटी होत्या. यामुळे राजघराण्याने यावर्षी संपत असलेला करार पुन्हा पुढे न वाढण्याचा विचार चालवला असून तसे पत्रही सतीष कदम यांना पाठविले आहे.
दरम्यान, तहसीलदार सतीष कदम हे आजारी असल्याने ते सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे नायब तहसीलदार शशीकांत जाधव यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्हाला राजघराण्याकडून पंधरा दिवसांपूर्वीच पत्र आले आहे. त्यांनी तहसीलदार कार्यालय खाली करा असे सांगितले आहे.
मात्र, करार वाढवा, असे सांगणार असल्याचे ते म्हणाले. चार दिवसात करार संपणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच बांधकाम विभागाने जागेची पाहणी केली असून जागेचे भाडे ३६ हजार वरून ४० करण्यात यावे, असे सुचविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
इमारतीला निधी नसल्याने बांधकाम रखडले
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाची भव्य दिव्य इमारत बांधायची या हेतूने तहसीलदार कार्यालय तीन वर्षापूर्वी खाली केले. मात्र, अद्यापही इमारत बांधण्यात आली नसून ही इमारत तीन वर्षात पूर्ण करण्याची मुदत होती. यासाठी २ कोटीचा निधीही मंजूर करण्यात आला होता. पण सध्या या इमारतीचा पाया बांधून पूर्ण झाला असून निधी अभावी पुढचे काम सुरू नसल्याचे तहसीलदार विभागाने स्पष्ट केले आहे.