स्त्रियांनी स्वत:ला स्वत:चेच प्रेरणास्थान बनवा
By admin | Published: March 9, 2015 09:07 PM2015-03-09T21:07:11+5:302015-03-09T23:53:54+5:30
रश्मी आठल्ये: राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे महिला मेळावा
रत्नागिरी : स्त्रियांनी सक्षम, सुशिक्षित व सबळ होण्यासाठी प्रत्येक घरातील पुरुषही सक्षम, सबळ, सुशिक्षित होणे आवश्यक आहे. स्त्रियांनी स्वत:ला घडवित असताना स्वत:चेच प्रेरणास्थान बनावे, असे आवाहन डॉ. रश्मी आठल्ये यांनी केले.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे आयोजित महिला मेळाव्यात डॉ. आठल्ये बोलत होत्या. रत्नागिरी येथे महिला दिनानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांना त्यांनी पंडुरोगाविषयी माहिती देऊन स्त्रियांमधील घटणाऱ्या हिमोग्लोबीनच्या प्रमाणाबद्दल माहिती दिली. स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये ०.९ टक्के असलेले एचआयव्हीचे प्रमाण घटत असल्याचे सांगून सध्या ते ०.१ टक्क्यावर आले असल्याचे नमूद केले. समाजाला एचआयव्हीपासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाची सामाजिक बांधिलकी असून, ती जोपासणे आवश्यक असल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले.मेधा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना स्त्री सक्षम बनली, तरच कुटुंबाची प्रगती होते, प्रत्येक स्त्रीने स्त्रियांचा आदर राखणे आवश्यक असल्याचे सांगितले. महिला महिलांप्रती आदर राखेल, त्याचवेळी अन्यजनही आदर करावयास शिकतील, असे त्या म्हणाल्या.विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी महिलांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजलक्ष्मी सुर्वे यांनी केले. यावेळी रत्नागिरी विभागातील विविध कर्मचारी महिला भगिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)
महिला दिनानिमित्त केले होते आयोजन.
महिलांना पंडुरोगाविषयी दिली माहिती.
स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक : आठल्ये.
स्त्रियांनी स्त्रियांचा आदर करावा : कुलकर्णी.