तरुणांना सामाजिक कार्यात सहभागी करून घ्याव
By admin | Published: January 21, 2015 09:26 PM2015-01-21T21:26:02+5:302015-01-21T23:51:13+5:30
बबन परब : कलमठ-कुंभारवाडीत आरोग्य शिबिरे
कणकवली : तरुणांमध्येही समाजाबद्दल संवेदना आहेत. त्यांच्यातील या संवेदना जागृत करण्यासाठी समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित मंडळींनी पुढाकार घेऊन तरुणांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले पाहिजे. तसेच संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट व डेरवण वालावलकर रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने घेतलेला आरोग्यविषयक उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन अणाव आनंद आश्रमाचे अध्यक्ष बबन परब यांनी केले.संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट व डेरवण वालावलकर रुग्णालयावतीने कलमठ- कुंभारवाडी साई गणेश मंदिर येथे शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी परब बोलत होते. यावेळी डॉ. विद्याधर तायशेटे, वालावलकर रुग्णालयाचे डॉ. दीपक शुक्ला, संवेदना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विलास गुडेकर, कलमठ- तरंदळे पंचायत समिती मतदारसंघाच्या सदस्या स्वरूपा विखाळे, सुनील नाडकर्णी, विलास बुचडे, विशाल हर्णे, हेमंत गोवेकर, डॉ. अश्विनी नेवरे, आदी उपस्थित होते.परब म्हणाले, आजची तरुण पिढी बिघडली आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. तरुणांमध्येही समाजाबद्दल संवेदना असून, या संवेदना जागृत करण्याचे काम तुम्ही-आम्ही केले पाहिजे. आजची तरुण पिढी देशाची मोठी ताकद आहे. या ताकदीचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. या पिढीला सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्याची जबाबदारी समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित मंडळींची आहे. तसेच अणाव येथील आनंद आश्रम हे मी एकटा चालवीत नसून जिल्ह्यातील सर्व मंडळींचा हातभार लागत आहे, असे ते म्हणाले.
डॉ. विद्याधर तायशेटे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतल्यास कोणत्याही आजाराला बळी पडणार नाही. आपले आरोग्य संतुलित राहण्यासाठी दररोज व्यायाम करणे व सकस आहार घेणे आवश्यक आहे. तसेच संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट व वालावलकर रुग्णालयाने घेतलेला आरोग्यविषयक उपक्रम स्तुत्य आहे.
स्वरूपा विखाळे म्हणाल्या, शहरी भागात आरोग्यविषयक उपक्रम राबविले जातात; परंतु ग्रामीण भागात आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे प्रमाण कमी आहे. हे उपक्रम राबविण्यासाठी संवेदना चॅरिटेबल ट्रस्टने सातत्य ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. सुनील नाडकर्णी म्हणाले, संवेदना चॅरिटेबल ट्रस्टचे काम आदर्शवत आहे. या ट्रस्टचे आदर्श जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी घ्यावा, असे ते म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे स्वागत संवेदना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विलास गुडेकर यांनी केले. सूत्रसंचालन बाळू मेस्त्री यांनी
केले. जोशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)