दोडामार्गमधील ग्रामीण मार्ग चिखलाने माखले
By admin | Published: August 29, 2014 10:41 PM2014-08-29T22:41:01+5:302014-08-29T23:09:46+5:30
गणेशोत्सवातही प्रशासन सुस्तच
वैभव साळकर - दोडामार्ग -गणेशोत्सवाच्या कालावधीतही तालुक्यातील जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्गांची जिल्हा परिषद बांधकाम खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशरक्ष: वाताहात झाली आहे. तालुक्यातील झोळंबे-कुडासे, मणेरी- कुडासे, भेडशी- उसप- पिकुळे, साटेली, खोक्रल- मांगेली, वझरे-तळेखोल आदी महत्त्वपूर्ण रस्त्यांची देखभाल दुरूस्तीच होत नसल्याने रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झाडी आणि डांबरीकरण रस्त्यावर मातीची मलमपट्टी केली जात असल्याने हे सर्व मार्ग पावसाळ्यात सर्वत्र चिखलाने माखल्याने दयनीय अवस्था झाली आहे.
दोडामार्ग तालुका निर्मितीच्या एका तपानंतरही अद्याप रस्ते निर्मिती आणि रस्त्यांची देखभाल दुरूस्ती करणारे जिल्हा परिषदचे बांधकाम विभाग कार्यालय दोडामार्गात कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे स्वतंत्र दोडामार्ग तालुक्याचा कार्यभार ५० ते १०० किलोमीटर अंंतरावरून म्हणजेच पूर्वीच्या सावंतवाडी तालुक्यातून हाकला जात आहे. परिणामी नागरिकांच्या पायाभूत सुविधेतील रस्ते सुविधेच्या मूळ उद्देशालाच खो घातला जात असल्याचे चित्र आहे. गतिमान प्रशासन आणि पालकमंत्र्यांचे वजन यामुळे नवख्या दोडामार्ग तालुक्यातील खेडोपाड्यात नवीन रस्त्यांची निर्मिती झपाट्याने होत असली तरी पूर्वी साकारलेल्या जिल्हा आणि ग्रामीण मार्गांची वाताहात सुरू आहे. झोळंबे-तळकट, कुंब्रल ते कुडासे हा तळकट दशक्रोशीतील अनेक गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेला रस्ता आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून या रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी नागरिक करत आहेत. मात्र, त्याकडे बांधकामने साफ दुर्लक्ष केले आहे. डांबरीकरण रस्त्यावरील खड्डे मातीने बुजविले. रस्त्याची साईडपट्टी उखडल्याने आणि रस्त्यावरील मोऱ्याही ढासळल्याने या मार्गावरील वाहतूकही धोक्यात आहे.
तर भेडशी ते उसप-पिकुळे, मणेरी-कुडासे आणि साटेली-खोक्रल मांगेली या रस्त्यांचीही अवस्था देखभाल दुरूस्तीअभावी कमालीची बिकट बनली आहे. यामार्गावरही खड्यांचेच जाळे विणले गेल्याने रस्त्यांची चाळण बनली आहे. उसप-पिकुळे रस्त्याच्या डागडुजीसाठी गतवर्षी रस्त्याच्या कडेला खडी टाकण्यात आली. मात्र, त्या रस्त्यांची डागडुजी झालेली नाही. त्यामुळे बांधकाम खात्याची बेपर्वाई याठिकाणी अधोरेखित होते. दिवसेंदिवस गतिमान होणारे प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी अनेकाअंगी योजना राबवित असताना संबंधित खात्याचे अधिकारी मात्र सुस्तच असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.