मालवणला मुसळधार पावसाने झोडपले

By admin | Published: June 27, 2016 10:54 PM2016-06-27T22:54:59+5:302016-06-28T00:34:53+5:30

तालुक्यात लाखोंचे नुकसान : वादळाचा तडाखा

Malavani was overwhelmed by heavy rains | मालवणला मुसळधार पावसाने झोडपले

मालवणला मुसळधार पावसाने झोडपले

Next

मालवण : मालवण तालुक्यात सोमवारी दिवसभर मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. सकाळी वादळी वाऱ्याने किनारपट्टी भागाला मोठा फटका बसला असून, मालवणसह देवबाग, वायंगणी गावाला वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने पाच लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. समुद्रही खवळला असून, अजस्र लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. सोमवारी दिवसभर पावसाच्या दमदार सरींनी हजेरी लावल्याने मालवणात ठिकठिकाणी पाणी साचले होते, तर ग्रामीण भागात पडझडीमुळे लाखोंची हानी झाली आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. शहरातील गटारे, तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पादचाऱ्यांना चिखलाशी सामना करावा लागत होता. बंदर विभागाने समुद्रात लावलेला ‘बोया’ लाटांबरोबर किनाऱ्यावर आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी समुद्रात जलसमाधी मिळालेल्या बोटींचे अवशेष किनाऱ्यावर वाहून आले आहेत. मालवण तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून, जून महिन्यात १३०० मि.मी.ची पावसाने बरसात केली आहे. येत्या ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
तालुक्यात पडझड : लाखोंची हानी
मालवण शहरातील किनारपट्टी भागाला सकाळी वाऱ्यांचा फटका बसला. किनाऱ्यालगत मत्स्य व्यावसायिक ताम्हणकर यांच्या मत्स्य सेंटरलगत माड कोसळला, तर लगतची काही घरे व दुकाने यांचे पत्रे व छपराचा काही भाग उडून गेला. शहरातील सेवांगण मार्गावरील वीज वाहिनीवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला, तर काही काळ मार्गही बंद होता. तालुक्यातील वायंगणी तिठा येथील विष्णू शांताराम साळकर यांच्या गणेशमूर्ती शाळेवर आंब्याचे झाड कोसळल्याने सुमारे दोन लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे. मूर्तिशाळेतील नव्वद गणेशमूर्ती तुटून गेल्या आहेत. याबाबत वायंगणी सरपंच प्रज्ञा धुळे, उपसरपंच हनुमंत प्रभू, ग्रामस्थ, तलाठी, पोलिस पाटील यांनी मदतकार्य करून पंचनामा केला. सभापती हिमाली अमरे यांनी भेट देऊन तातडीने ताडपत्रीची व्यवस्था केली, तर वायंगणी पाटवाडी येथील रस्त्यावरच विद्युत वाहिनीवर जांभळाचे झाड पडल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. धोकादायक जांभळाच्या झाडाबाबत यापूर्वी वीज वितरणला माहिती देण्यात आली होती; मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)


देवबागात बोटींचे नुकसान
सोमवारी सकाळी वाऱ्याचा तडाखा देवबाग गावालाही बसला. किनाऱ्यालगत ठेवलेल्या तीन मासेमारी फायबर बोटींवर झाड कोसळल्याने दोन बोटी फुटल्या आहेत.
यात गोपाल मधुसूदन कुमठेकर
यांच्या एका बोटीने एक लाख, तर लक्ष्मण गणपत चिंदरकर यांच्या दोन बोटींचे मिळून एक लाख २० हजारांचे नुकसान झाले.
याबाबत महसूल विभागाला माहिती दिली असता आपल्याकडे केवळ घर व गोठे यांचे नुकसान नोंदविले जाते असे सांगितले.
मत्स्य विभागाकडेही कोणतीही नुकसानभरपाईची तरतूद नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत माजी उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Malavani was overwhelmed by heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.