मालवणातील मच्छिमार पुन्हा आक्रमक
By admin | Published: December 26, 2015 11:56 PM2015-12-26T23:56:04+5:302015-12-26T23:56:04+5:30
पोलीस निरीक्षकांचे आवाहन : मच्छिमारांनी कायदा हातात घेऊ नये
मालवण : मालवणातील ट्रॉलर्स व्यावसायिकांनी हायस्पीड विरोधात किनारपट्टीवर तीव्र लढा उभारण्याचे निश्चित केले आहे. लवकरच सर्वपक्षीय आमदार, लोकप्रतिनिधी यांची भेट घेतली जाणार असल्याचे मच्छिमारांनी स्पष्ट केले आहे. न्यायासाठी लढा तीव्र करणे गरजेचे आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसेच आमदार वैभव नाईक, नीतेश राणे यांसह रत्नागिरीतील आमदारांची भेट घेऊन मच्छिमार आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, परप्रांतीय हायस्पीड व पर्ससीन ट्रॉलर्सची घुसखोरी थांबवताना मच्छिमारांनी कोणत्याही स्वरुपात कायदे हातात घेऊ नये. बोटींना पकडल्यानंतर त्या बोटींवरील किंमती साहित्य चोरीला जाण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वीही असे प्रकार घडले असल्याने नाहक मच्छिमारांवर कारवाई करण्याची वेळ येईल. असा सूचक इशारा पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी मालवणातील ट्रॉलर्स, गिलनेट व्यावसायिकांना दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी सर्जेकोट येथील ट्रॉलर्स व्यावसायिक गोपीनाथ तांडेल यांना हायस्पीड धारकांकडून फोन वरून बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत सर्जेकोट व मालवण येथील ट्रॉलर्स व गिलनेटधारक व्यावसायिकांनी मालवण पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन या धमकीची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
यावेळी पोलीस निरीक्षक यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत त्या मोबाईल नंबरचे कॉल डीटेल्स मागविण्यात आलेले आहेत. जर धमकी देणारा कर्नाटक मलपी येथील असल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पोलीस महानिरीक्षक यांची परवानगी घेऊन योग्य ती कारवाई करू असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
पालकमंत्री कर्नाटकचे आहेत काय ?
कर्नाटक मलपी येथील हायस्पीड सिंधुदुर्गात धुमाकूळ घालत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अजूनही गप्पच आहेत. ते कोणतीही भूमिका स्पष्ट करत नाहीत. अथवा कारवाईबाबत मत्स्य विभाग, पोलीस प्रशासनास आदेशही देत नाहीत. पालकमंत्री हे सिंधुदुर्गचे आहेत की कर्नाटकचे ? असा सवाल मच्छिमारांनी उपस्थित केला आहे.