पैसे हडप करण्याचा प्रकार शिक्षण नव्हे क्रिडा विभागात, मंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती
By अनंत खं.जाधव | Published: April 24, 2024 05:52 PM2024-04-24T17:52:59+5:302024-04-24T17:53:55+5:30
'ज्याने कृत्य केले ते लवकरच बाहेर येईल'
सावंतवाडी : शिक्षण विभागात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसून क्रीडा विभागात तो प्रकार घडला आहे. मात्र, त्या संदर्भात मुंबई येथील मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. प्रत्येक खात्याचे वेगवेगळे सचिव असतात. त्यामुळे मी प्राथमिक माहिती घेतली असता क्रीडा विभागात तो प्रकार घडला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मंत्री केसरकर हे बुधवारी सावंतवाडीत आले असता पत्रकारांशी परिषदेत बोलत होते.
मात्र, ज्याने हे जे कृत्य केले आहे, त्याची चौकशी होणार असून बँक कडून सखोल माहिती घेण्यात येत आहे त्यानंतरच सत्य उजेडात येईल असे मंत्री केसरकर म्हणाले. मंत्रालयात धनादेशावर खोट्या सह्या करून पैसे हडप केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार शिक्षण व क्रीडा विभागात झाल्याची चर्चा आहे. याबाबत केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, शिक्षण व क्रीडा विभाग हे वेगवेगळे विभाग आहेत. दोन्ही विभागाचे सचिव वेगवेगळे आहेत.
क्रीडा विभागात हा प्रकार झाला आहे, असे माझ्या सचिवांनी सांगितले. मात्र, बनावट धनादेशावर, सह्या करून बँकेमध्ये ते धनादेश वठवण्यात आले आहेत. मात्र, बनावट धनादेश कोणी बनवले हे लवकरच पुढे येणार आहे. घोटाळा शिक्षण विभागात झाला नाही.मात्र, शिक्षण व क्रीडा विभाग हे जरी एकत्र असले, तरी क्रीडा विभागाचे मंत्री हे वेगळे आहेत आणि तेच त्याबाबत काय ते उत्तर देऊ शकतात. मात्र, असा प्रकार होणे ही गंभीर बाब आहे असल्याचे केसरकर म्हणाले.