राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर मालवण बंद
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 28, 2024 11:48 AM2024-08-28T11:48:43+5:302024-08-28T11:50:14+5:30
विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली
मालवण: मालवण राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज माहाविकास आघाडी आणि शिव प्रेमींनी बंदची हाक दिली आहे. यापार्श्वभूमीवर आज, गुरुवारी मालवण येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सर्वच व्यापाऱ्यांनी आपली अस्थापने बंद ठेवली होती. मोर्चाच्या प्रारंभीच शहरातील नाक्या-नाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
येथील शिवसेना शाखेजवळ शिवसैनिकांनी मोठी गर्दी करायला सुरुवात केली होती. शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करायला सुरुवात केली होती. पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
नौदल दिनाच्या निमित्ताने भारतीय आरमाराचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवण येथे उभारण्यात यावा अशी भारतीय नौदलाची योजना होती. या योजनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने नौदलाने सिंधुदुर्ग किल्ल्या नजिक राजकोट येथे तब्बल पाच कोटी रुपये खर्चून राजकोट किल्ल्याची आणि त्यात १५ फूट उंच चबुतऱ्यावर २८ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा उभारण्यात आला होता.