मालवणचा आज दिवाळी दीपोत्सव
By admin | Published: November 11, 2015 10:05 PM2015-11-11T22:05:03+5:302015-11-11T23:39:41+5:30
३५0 वर्षाहून अधिक जुनी परंपरा : मंदिर सोडून पालखी भक्तांच्या भेटीला
मालवण : मालवण शहराला ऐतिहासिक आणि शिवकालीन परंपरा लाभलेली आहे. येथील प्रत्येक सण-उत्सव जणू शिवकालीन परंपरेच्या धाग्याने जोडला गेला आहे. या उत्सवांपैकी प्रमुख सोहळा म्हणजे श्री देव रामेश्वर-नारायण पालखी उत्सव. मालवणचे ग्रामदैवता श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा वार्षिक ऐतिहासिक पालखी प्रदक्षिणा सोहळा दीपावलीनिमित्त गुरुवार १२ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या सोहळ्याला शिवकालीन परंपरा लाभली असून ३५० वर्षापासून पालखी उत्सव गुण्या गोविंदाने साजरा केला जातो.
भावंडाच्या भेटीसाठी निघालेल्या हजारो मालवणवासीय भक्तांसाठी रामेश्वर-नारायण देवता आपले राऊळ (मंदिर) सोडून धावून येतात. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या या सोहळ्यात मालवणसह जिल्हावासीयही सहभागी होतात. शेकडो वर्षापासून सुरु असणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याची भव्यता दरवर्षी वाढत असताना भक्तांची मांदियाळी रामेश्वराच्या भेटीला एकत्र येते. अन उत्सवाच्या निमित्ताने मित्र-आप्तेष्टांच्या भेटीबरोबरच लाखोंची उलाढाल मालवणच्या बाजारपेठेत केली जाते. अन् आशीर्वादाबरोबरच लक्ष्मीची पावले घेवून येणाऱ्या देव रामेश्वर-नारायण यांच्या पालखी उत्सवातच मालवणकरांची दिवाळी खऱ्या अर्थाने दीपोत्सव म्हणून साजरी होते.
आपली मंदिरे सोडून पालखीत बसून समुद्रीमार्गे निघणारी ही दोन्ही देवता मार्गक्रमणेवरील मंदिरात जाऊन आपल्या बहिण-भावांनाही भेटी देतात. ठिकठिकाणी देवतांचे स्वागतही प्रत्येक मालवणवासीय सडा-रांगोळी आणि पुष्पवृष्टीने करतो. साधारण ३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी किल्ले सिंधुदुर्गच्या मोरयाचा धोंडा येथील पायाभरणी समारंभावेळी मालवणच्या ग्रामदेवता श्री देव रामेश्वर-नारायणाची पूजा करताना विधिवत शुद्धीकरण व पुन:प्रतिष्ठापना केली. त्यावेळीपासूनच हा सोहळा सुरु झाला असे जाणकारांतून बोलले जाते.
मच्छिमार बांधवाकडून रामेश्वराचे-नारायणाचे होणारे स्वागत वेगळेच म्हणावे लागेल. याबरोबरच समुद्रातील बोट सेवा सुरु असताना प्रमुख बंदरांपैकी एक असे मालवणचे बंदर आणि याला जोडून असलेली मालवण बाजारपेठ. जाणकार आणि इतिहासकारांच्या भाषेत सांगायचे तर मालवण बाजारपेठेतून सोन्याचा धूर निघायचा.
म्हणजेच त्याकाळीही हजारो लाखोची उलाढाल व्हायची. मात्र बोट सेवा बंद झाल्यावर मालवणचे वैभव मागे पडले. मात्र, रामेश्वराच्या कृपेने मासेमारी बरोबरच पर्यटनाने मालवणला साथ दिल्याने पुन्हा वैभवशाली बाजारपेठ फुलू लागली. बाजारपेठेतील व्यापारी बांधव व नागरिकांकडून पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात करतात. पालखी सोहळा आणि दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने लाखोची उलाढाल एका रात्रीत होते. (प्रतिनिधी)
लागलीये आस : शेकडो भाविक न्हाऊन निघणार
मालवणची ग्रामदैवता श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण आज गुरुवार १२ नोव्हेंबर रोजी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने राऊळ सोडून मालवण वासीयांच्या भेटीला बाहेर पडतात. रामेश्वर मंदिर येथून दुपारी एक वाजता देवतांना सांगणे करून पालखी गाव प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होणार आहेत. आडवण, तानाजी नाका, भूतनाथ मंदिर, समुद्रीमार्गे मोरयाचा धोंडा, दांडेश्वर मंदिर, श्री देवी काळबाई मंदिर, जोशी मांड येथून बाजारपेठ रामेश्वर मांड येथे पालखी ८.३० ते १० वाजेपर्यंत दर्शनासाठी थांबेल. त्यानंतर रात्री बाजारपेठ, भरड, देऊळवाडामार्गे पुन्हा पालखी मंदिरात जाईल. देवस्थान मानकरी व भाविक यांच्या मेळ्यांबरोबरच ढोल-ताशाच्या गजर, फटाक्यांची आतषबाजी अशा उत्सवातील आनंद सोहळ्यात शेकडो मालवणवासीय न्हाऊन निघणार आहे.