मालवण पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर, महेश सरनाईक यांना कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 06:55 PM2021-12-25T18:55:30+5:302021-12-25T18:56:00+5:30
मालवण तालुका पत्रकार समितीच्यावतीने दिले जाणारे सन २०२०-२१ या वर्षाचे तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार जाहीर.
मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्यावतीने दिले जाणारे सन २०२०-२१ या वर्षाचे तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार अध्यक्ष संतोष गावडे यांनी आज, शनिवारी जाहीर केले.
कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार लोकमत सिंधुदुर्गचे वरीष्ठ उपसंपादक तथा आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार संदीप बोडवे तर पत्रकार अमित खोत पुरस्कृत 'बेस्ट स्टोरी अवार्ड' हा विशेष पुरस्कार लोकमतचे मालवण प्रतिनिधी पत्रकार सिद्धेश आचरेकर यांना जाहीर झाला आहे. ५ जानेवारीला धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
मालवण तालुका पत्रकार समितीची सभा शनिवार २५ डिसेंबर रोजी धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे समिती अध्यक्ष संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विद्याधर केनवडेकर, सचिव कृष्णा ढोलम, खजिनदार सिद्धेश आचरेकर, उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सहसचिव परेश सावंत यांच्यासह तालुक्यातील समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीत पुरस्कारांची घोषणा तसेच अन्य विषयांवर चर्चा झाली.
दरवर्षी ६ जानेवारीला होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. त्यानुसार हा सोहळा ५ जानेवारीला निश्चित करण्यात आला आहे. संस्कार हॉल येथे सकाळी १० वाजता मान्यवर, निमंत्रित यासह पत्रकार सदस्य व कुटुंबीयांच्या उपस्थितीत पत्रकार पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
कोरोना काळात जिल्हा रुग्णालयात उत्कृष्ट सेवा बजावणारे राजेश पारधी, मालवण पंचायत समितीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त अमित खोत आणि पोईप सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत विजयी झालेल्या संतोष हिवाळेकर या पत्रकारांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली आहे.
तहसीलदार, उपमुख्यकार्यकरी अधिकारी यांचा विशेष सत्कार
मालवण पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या तीन पत्रकार पुरस्कारसह प्रशासकीय सेवेत सर्वोत्कृष्ट व लोकाभिमुख सेवा बजावत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तहसीलदार अजय पाटणे, उपमुख्यकार्यकरी अधिकारी राजेंद्र पराडकर या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही विशेष सत्कार या सोहळ्याच्या निमित्ताने केला जाणार आहे.