मालवणवासीयांकडून बंटरजेटी किनाऱ्यावर नरकासूराचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 03:02 PM2017-10-19T15:02:00+5:302017-10-19T15:10:52+5:30
नरक चतुर्दशीनिमित्त वाईट गोष्टींचे प्रतिक असणाऱ्या नरकासुराच्या प्रतिमांची शहरातून धिंड काढत मालवणवासीयांनी बंदर जेटी किनाऱ्यावर बुधवारी पहाटे नरकासुराचे दहन केले. यानिमित्त मालवणातील बच्चे कंपनी व युवकांनी साकारलेल्या भव्य नरकासूर प्रतिमांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी शिवसेनेने आयोजित केलेल्या नरकासूर प्रतिमा स्पर्धेत बांगीवाडा मित्रमंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
मालवण , दि. १९ : वाईट प्रवृत्तीचा नाश करून चांगली प्रवृत्ती व गोष्टी अंगिकारण्याचा दिवस म्हणजे दिवाळीतील नरक चतुर्दशीचा दिवस होय. यानिमित्त वाईट गोष्टींचे प्रतिक असणाऱ्या नरकासुराच्या प्रतिमांची शहरातून धिंड काढत मालवणवासीयांनी बंदर जेटी किनाऱ्यावर पहाटे नरकासुराचे दहन केले.
यानिमित्त मालवणातील बच्चे कंपनी व युवकांनी साकारलेल्या भव्य नरकासूर प्रतिमांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी शिवसेनेने आयोजित केलेल्या नरकासूर प्रतिमा स्पर्धेत बांगीवाडा मित्रमंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
नरक चतुर्दशीनिमित्त मालवणात अलिकडे दरवर्षी भव्य व आकर्षक सजावटीच्या नरकासूर प्रतिमा बनविण्यात येतात. यामध्ये बच्चे कंपनी व युवक वर्गाचा मोठा सहभाग दिसून येतो. यावर्षीही मोठ्या उत्साहात व मोठ्या संख्येने शहरातील अनेक ठिकाणी नरकासूर बनविण्यात आल्या.
सायंकाळपासून बालगोपाळ व तरुणांनी शहरातून या नरकासुर प्रतिमांची धिंड काढली. आकर्षक सजावट व विविध मुद्रांमधील साकारलेल्या नरकासुराच्या प्रतिमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रात्री उशिरापर्यंत तसेच पुन्हा पहाटे या प्रतिमांची वाजत गाजत व फटाक्यांची आतषबाजी करत धिंड काढण्यात आली.
यानंतर मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यावर पहाटे ४ वाजल्यापासून या नरकासूर प्रतिमांचे दहन करण्यात आले. सकाळी सात पर्यंत सुमारे २५ ते ३० नरकासूर प्रतिमांचे दहन करण्यात आले. यावेळी मालवणातील बहुसंख्य नागरिकांनी मालवण बंदर जेटी किनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती.
नरकचतुर्दशीनिमित्त मालवण शिवसेनेतर्फे भरड नका येथे नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बहुसंख्य बालगोपाळ मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होत आकर्षक नरकासूर प्रतिमा सादर केल्या होत्या. या स्पर्धेत बांगीवाडा मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.
अवि कामते मित्र मंडळ द्वितीय व जोशी मित्रमंडळ, मेढा यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या मंडळाना आमदार वैभव नाईक यांनी पुरस्कृत केलेली पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन शिंदे, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, नंदू गवंडी, किरण वाळके, राजू परब, नगरसेविका आकांशा शिरपुटे, दिपा शिंदे आदी व इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपास्थित होते.