व्हेलच्या बचाव कार्यात मालवणच्या तरुणांची कर्तबगारी, अंगीभूत समुद्री कौशल्य आले कामी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 01:36 PM2023-11-17T13:36:42+5:302023-11-17T13:37:42+5:30

संदीप बोडवे मालवण: गणपतीपुळे येथील किनाऱ्यावर आलेल्या व्हेलला समुद्रात सुखरूप सोडण्यात दुर्दैवाने अपयश आले असले तरीही, या बचाव कार्यात ...

Malvan's young people are commendable for their efforts in whale rescue, Inherent seamanship came in handy | व्हेलच्या बचाव कार्यात मालवणच्या तरुणांची कर्तबगारी, अंगीभूत समुद्री कौशल्य आले कामी

व्हेलच्या बचाव कार्यात मालवणच्या तरुणांची कर्तबगारी, अंगीभूत समुद्री कौशल्य आले कामी

संदीप बोडवे

मालवण: गणपतीपुळे येथील किनाऱ्यावर आलेल्या व्हेलला समुद्रात सुखरूप सोडण्यात दुर्दैवाने अपयश आले असले तरीही, या बचाव कार्यात मालवणच्या युवकांनी दाखविलेली कर्तबगारी विशेष कौतुकास्पद ठरली. गणपतीपुळे येथील एमटीडीसीच्या बोट क्लबचे व्यवस्थापक विवान राणे, सह व्यवस्थापक विशाल राठोड आणि त्यांच्या मालवण येथील टीम ने व्हेलला वाचविण्यासाठी आपले अंगीभूत असलेले समुद्री कौशल्य पणाला लावत प्रयत्नांची मोठी पराकाष्ठा केली. त्यांच्या या कामगिरीचे सागरी संशोधक सारंग कुलकर्णी यांच्या सह अनेकांनी कौतुक केले आहे. 

गणपतीपुळे येथे व्हेलच्या बचाव कार्यात वन विभागा सोबत सहभागी झालेल्या अन्य यंत्रणांमध्ये तेथील एमटीडीसी बोट क्लबच्या टिमचाही समावेश होता. या टीम मध्ये बोट क्लबचे व्यवस्थापक जे मरीन बायोलॉजिस्ट आणि डाईव्ह मास्टर असलेले विवान राणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कुबा इंस्ट्रक्टर आणि रेस्क्यू डायव्हर विशाल राठोड, जेटस्की इंस्ट्रक्टर अक्षय केरकर, वैभव केळुस्कर, गणेश राऊळ, दत्ताराम तोरसकर यांचाही सहभाग होता. मालवणच्या या टीम मधील सदस्यांनी तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटिक स्पोर्ट्स (इसदा) मध्ये वॉटर अॅडव्हेंचर ॲक्टिव्हीटीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 

प्रयत्नांची पराकाष्ठा

विशाल राठोड म्हणाले, सुरुवातीला आम्हाला बोट क्लब मधून समुद्रात काही तरी तरंगत असल्याचे आढळले. थोड्याच वेळात ते किशोरवयीन व्हेल आल्याचे लक्षात आले. त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून होतो. परंतु किनाऱ्यालगत येताच आमच्या टीम ने लगेचच त्याच्या बचावाचे प्रयत्न सुरू केले. उपलब्ध सामुग्री आणि स्पीड बोटींच्या सहाय्याने आम्ही त्याला समुद्रात सोडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र हा व्हेल पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर येत असल्यामुळे आमचे प्रयत्न तोकडे पडले. आम्ही तात्काळ वन अधिकाऱ्यांना या बाबत कळविले आणि त्यांच्या सोबत व्हेलला समुद्रात सोडण्याच्या कामात सामील झालो. मदत आणि सामुग्री उपलब्ध होई पर्यंत लागलेल्या कालावधीत किनाऱ्यावर पडलेल्या व्हेलची त्वचा सूर्य किरणांमुळे भाजू नये म्हणून क्लब मधील बेडशिट ओल्या करून व्हेलच्या अंगावर पसरविल्या. 

अनेक कारणे शक्य

विवान राणे म्हणाले, व्हेलच्या डोक्यात असलेल्या इको साऊंडीग सिस्टीम मध्ये झालेल्या बिघडासह व्हेल किनाऱ्यावर येण्याची अनेक कारणे असू शकतात. नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यान समुद्राच्या पाण्यात अपवेलिंग होत असते. यातून समुद्रात समुद्री जीवांसाठी पोषक तत्वे तयार होतात. यामुळे छोटे मासे व त्यांना खाण्यासाठी मोठे मासे किनाऱ्यालगत येतात. व्हेल च्या बचाव कार्यामुळे अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्यात ज्या भविष्यात दिशा दर्शक ठरतील.

अंगीभूत गुण

बचाव पथकाचे कौतुक करताना सारंग कुलकर्णी म्हणाले, मालवणच्या युवकांमध्ये सागरी जीवांच्या संवर्धनाचे अंगीभूत गुण आहेत. याचाच या उदाहरणावरून प्रत्यय आला. त्यांचा मला अभिमान आहे. या युवकांमध्ये आलेले सागरी कौशल्य भविष्यात महत्त्वाची भूमिका बजाताना दिसणार आहे.

Web Title: Malvan's young people are commendable for their efforts in whale rescue, Inherent seamanship came in handy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.