भाच्याच्या लग्नाला जाताना मामाचा अपघाती मृत्यू
By Admin | Published: February 14, 2016 12:58 AM2016-02-14T00:58:05+5:302016-02-14T00:58:05+5:30
वालावल येथील घटनेने हळहळ : लग्नादिवशीच पावसकर कुटुंबीयांवर काळाचा घाला
कुडाळ : भाच्याच्या विवाहासाठी जाताना झालेल्या अपघातात डंपरच्या चाकाखाली सापडून सुरेंद्र वामन पावसकर (वय ४८, रा. पावशी) हे जागीच ठार झाले. हा अपघात कुडाळ-कवठी रस्त्यावर वालावल (आंबेडकरनगर) येथे शनिवारी सकाळी घडला. लग्नाच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने या दुर्घटनेने पावसकर कुटुंबीयांच्या आनंदोत्सवाचे क्षणात दु:खात रूपांतर झाले. अपघातस्थळी नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळेही पाणावले.
सुरेंद्र पावसकर यांचा भाचा योेगेश आडेलकर याचा शनिवारी पावशी येथे लग्नसोहळा होता. सकाळी ते आपला मेहुणा सखाराम रेडकर (रा. वेंगुर्ले) यांच्यासमवेत दुचाकीने वालावल येथे जात होते. त्यांच्यासोबत लग्नासाठी सजविण्यात येणाऱ्या गाडीवर लावण्यासाठी वधू-वरांची थर्माकोलमध्ये कोरलेली नावे होती. कुडाळ-कवठी रस्त्यावर वालावल (आंबेडकरनगर) येथे त्यांच्या दुचाकीपुढे डंपर जात होता. याचवेळी वाळूने भरलेला डंपर कुडाळच्या दिशेने येत होता. कवठीकडे जाणाऱ्या डंपरच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात गाडीचा ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्यानजीकच्या खड्ड्यात जाऊन पडली व पावसकर हे डंपरच्या मागील चाकाखाली सापडले. यात त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर घटनास्थळी निवती पोलीस ठाण्याचे जानकर यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या अपघातात सखाराम रेडकर यांच्या हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर वालावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी कुडाळ येथे नेण्यात आला.
कवठी रस्ता वाहतुकीला अयोग्य :
चिपी विमानतळाकडे जाणारा कवठी-वालावल हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वालावल ग्रामस्थांनी आवाज उठविला होता. मात्र, याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.
आनंदाचा पारावर अन् दु:खाचा डोंगर
पावसकर यांच्या घरात लग्न असल्याने गेले चार दिवस या कुटुंंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शनिवारी लग्नाच्या दिवशीही आनंदाचे वातावरण होते. पण पावसकर यांच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच क्षणात आनंदाचे रूपांतर दु:खात झाले.