समाजविघात रोखण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा
By admin | Published: July 10, 2014 12:14 AM2014-07-10T00:14:11+5:302014-07-10T00:20:35+5:30
संदेश पारकर : कणकवलीत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन
कणकवली : महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. ही परंपरा जपण्याचे काम सिंधुदुर्गातील भजन मंडळे करीत आहेत. सिंधुदुर्गला आध्यात्मिकतेचा वारसा लाभला असून समाजविघातक घटना रोखण्यासाठी भजन मंडळांनी पुढाकार घ्यावा. भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करावे, असे आवाहन कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी येथे केले.
सिंधु संप्रदाय भजन संस्था कणकवली व संदेश पारकर मित्रमंडळाच्यावतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून येथील प.पू. भालचंद्र महाराज आश्रमात जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी संदेश पारकर बोलत होते. यावेळी प.पू. भालचंद्र महाराज आश्रम समितीचे अध्यक्ष सुरेश कामत, सचिव विजयकुमार वळंजु, व्यवस्थापक विजय केळुसकर, अवधूत मालणकर, नीलेश धडाम, भजनीबुवा भास्कर गावडे, प्रकाश पारकर, सुदर्शन फोपे, श्रीकांत तेली, गोपी लाड, प्रकाश सामंत, स्पर्धेचे परीक्षक मोहन मेस्त्री, प्रमोद मेस्त्री आदी यावेळी उपस्थित होते.
संदेश पारकर म्हणाले, समाजाचे आपण काही देणे लागतो. या भावनेने जर प्रत्येक व्यक्तीने काम केले तर समाजविकास निश्चितच होईल. संत परंपरा जोपासत असलेल्या भजनी कलाकारांना राजाश्रय मिळावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. यामध्ये भजनी कलाकारांचे सहकार्य अपेक्षीत आहे. सुरेश कामत म्हणाले, भजन स्पर्धेच्या माध्यमातून भजनी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. पारकर यांचे अशा समाजोपयोगी उपक्रमांना नेहमीच सहकार्य असते. त्यामुळे त्यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना जनतेचाही नेहमीच प्रतिसाद लाभत असतो. विजयकुमार वळंजु यांनी विचार मांडले. स्वागत भास्कर गावडे यांनी तर सूत्रसंचालन प्रकाश पारकर यांनी केले. (वार्ताहर)