मांडुकलीत पुराचे पाणी रस्त्यावर; कोल्हापूर मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:51 AM2019-09-10T11:51:56+5:302019-09-10T11:55:11+5:30
गगनबावडा (कोल्हापूर) तालुक्यातील मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गौरी-गणपती विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या अनेक चाकरमान्यांची वाहने रस्त्यात अडकली आहे.
वैभववाडी : गगनबावडा (कोल्हापूर) तालुक्यातील मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गौरी-गणपती विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या अनेक चाकरमान्यांची वाहने रस्त्यात अडकली असून त्यांना गगनबावड्यातून माघारी परतावे लागत आहे. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विविध धरणांतून खबरदारी म्हणून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे तेथील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झालेल्या वाढीचा फटका तळेरे-कोल्हापूर मार्गाला बसला आहे. या मार्गावरील मांडुकली येथे रविवारी सकाळी पुन्हा पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. दोन ते तीन फूट पाणी रस्त्यावर चढल्याने या मार्गावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली आहे.
पोलीस प्रशासनाने वैभववाडीत वाहतूक बंद करण्यापूर्वी शेकडो वाहने कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. ही सर्व वाहने मांडुकली येथे जाऊन अडकली आहेत. पाणी ओसरण्याची शक्यता कमी असल्यामुळे या सर्व वाहनांना गगनबावड्यातून माघारी परतून फोंडाघाटमार्गे जावे लागत आहे.
दरम्यान, वैभववाडी पोलिसांकडून संभाजी चौकात वाहने थांबवून ती फोंडाघाटमार्गे मार्गस्थ केली जात आहेत. शुक्रवारी मांडुकली येथे पुराचे पाणी रस्त्यावर आले होते. त्यानंतर आता पुन्हा त्याच ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्यामुळे गणेशोत्सवासाठी आलेल्या अनेक चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास खडतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैभववाडी-फोंडा मार्गावर वाहनांच्या रांगा दिसत होत्या.
परंतु, या मार्गावर मोठ्या प्रमाणात सध्या खड्डे पडले असल्याने हे खड्डे चुकविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तालुक्यात रविवारी सकाळपर्यंत १५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.