मंगलमुर्ती मोरया!, सिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन
By सुधीर राणे | Published: September 19, 2023 12:20 PM2023-09-19T12:20:05+5:302023-09-19T12:20:21+5:30
कणकवली : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात आज, मंगळवारी सिंधुदुर्गात ३१ ठिकाणी सार्वजनिक तर ७१ हजार ७८९ ...
कणकवली : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात आज, मंगळवारी सिंधुदुर्गात ३१ ठिकाणी सार्वजनिक तर ७१ हजार ७८९ ठिकाणी घरगुती अशा एकूण ७१ हजार ८२० ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या आनंदोत्सवात लहान थोर दंग झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.
सिंधुदुर्गसह कोकणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी गेल्या एक महिन्यापासून अधिक काळ सुरु होती. भाद्रपद महिना सुरु झाला आणि या तयारीने आणखीनच वेग घेतला होता. अखेर भाद्रपद शुध्द चतुर्थीला म्हणजेच मंगळवारी गणरायाची भावपूर्ण वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली.
गणेशचतुर्थीच्या दिवशी होणारी तारांबळ टाळण्यासाठी काही ठिकाणी रविवारी तर काही जणांनी सोमवारी श्री गणेश मूर्ती घरी आणून ठेवल्या होत्या. तर काही ठिकाणी मंगळवारी सकाळी गणरायाचे आगमन झाले. सकाळपासूनच गणरायाच्या पूजेसाठी अनेक घरात लहान थोर मंडळींची लगबग सुरु होती. ढोल, ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी अनेक ठिकाणी सुरू होती. श्री गणेश मुर्तीची स्थापना झाल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आरतीही करण्यात आली. उकडीच्या एकविस मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण करण्यात आला.
प्रत्येक घरात पारंपरिक पद्धतीने तसेच प्रत्येकाच्या रुढीनुसार दीड, पाच, सात, नऊ, अकरा, सतरा, एकोणिस, एकविस, बेचाळीस असा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने सर्वत्र वातावरण भारावलेले राहणार आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. पोलिस प्रशासनही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सज्ज आहे.