माणगाव तिठ्ठा येथे साडेचार लाखांची चोरी
By admin | Published: January 4, 2017 10:54 PM2017-01-04T22:54:02+5:302017-01-04T22:54:02+5:30
बंगला फोडला : २० तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला
माणगाव : कुडाळ तालुक्यातील माणगाव तिठ्ठा शिक्षक कॉलनीत बुधवारी भरदिवसा अजय चव्हाण यांच्या बंगल्याच्या मागचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील १७ तोळे सोने, तीन तोळे चांदी व रोख १२ हजार रुपये असा एकूण साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला.
माणगाव तिठ्ठ्याजवळील शिक्षक कॉलनीत माणगाव हायस्कूलचे शिक्षक अजय चव्हाण हे आपल्या पत्नीसह राहतात. त्यांच्या पत्नीही त्याच हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी ९.३० वा. शाळेत स्नेहसंमेलन असल्याने घराला कुलूप लावून अजय चव्हाण व त्यांची पत्नी हायस्कूलमध्ये गेले. दुपारी १२.२० वाजण्याच्या दरम्यान पुन्हा घरी आले. घराचे कुलूप काढून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता आतून कडी लावल्याचे निदर्शनास आले. म्हणून मागच्या बाजूस असलेल्या दरवाजाकडे अजय चव्हाण गेले असता दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. आपण दरवाजा लावायला विसरलो, असे समजून त्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी अपूर्वा चव्हाण आपल्या बेडरूममध्ये गेल्या असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेचच माणगाव आऊटपोस्ट येथे याबाबत माहिती दिली.
घटनास्थळी माणगाव आऊट पोस्टचे पोलिस हवालदार सावळ, कॉन्स्टेबल कडकधोंड, आदी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला. यावेळी अज्ञात चोरट्याने १७ तोळे सोन्याचे दागिने त्यात सात बांगड्या, हार, अंगठ्या, तसेच तीन भाराचे चांदीचे दागिने व रोख १२ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरू न नेल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर कुडाळ पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योत्स्ना बांभिष्टे, गोसावी, पवार, रूपसुंदर, आदींनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, यावेळी श्वानपथकही आणण्यात आले; पण चोरीचा सुगावा लागू शकला नाही. (प्रतिनिधी)
चोरटे माहीतगार?
चव्हाण दाम्पत्याच्या कार्यरत शाळेच्या हायस्कूलचे स्नेहसंमेलन चालू असतानाच चोरांनी डाव साधला. त्यामुळे ही चोरी माहितगारांनी पाळत ठेवून केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांना जागरूक राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.