हिवाळ्यात पावसाळा; सिंधुदुर्गला झोडपले, आंबा, काजू पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 02:10 PM2021-12-02T14:10:02+5:302021-12-02T14:31:23+5:30

पावसामुळे वातावरणात कमालीचा गारठा आहे. मच्छीमारांसाठीही येत्या चोवीस तासांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mango and cashew crops will be affected by unseasonal rains in Sindhudurg district | हिवाळ्यात पावसाळा; सिंधुदुर्गला झोडपले, आंबा, काजू पिकांना फटका

हिवाळ्यात पावसाळा; सिंधुदुर्गला झोडपले, आंबा, काजू पिकांना फटका

googlenewsNext

सिंधुदुर्ग : गेले काही दिवस जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत होता. मात्र बुधवारी सायंकाळ पासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु झाली ती आज गुरूवारी दुपारपर्यंत कायम होती. या पावसाचा फटका आंबा आणि काजू पिकाला बसणार आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

चौवीस तास हाय अलर्ट

पाऊस मुसळधार नसला तरी तो सातत्याने पडत असल्याने वातावरणात कमालीचा गारठा होता. अनेक ठिकाणी धुक्यामुळे समोरचे काही दिसत नव्हते. मच्छीमारांसाठीही येत्या चोवीस तासांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मच्छिमार व्यवसाय ठप्प

मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मच्छीमारीसाठी गेलेल्या बहुतांशी नौका बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत देवगड बंदरात दाखल होत होत्या. सध्या बांगडा, म्हाकुल, सौंदाळा आदी मासळी मिळत होती. गेले आठ दिवस समाधानकारक स्थिती होती. मात्र वादळी वाऱ्यामुळे वातावरणात पुन्हा एकदा मच्छीमारी व्यवसायावर संकट कोसळले असून सुरळीत सुरू असलेला व्यवसाय ठप्प झाला आहे.

इतर राज्यातील नौका दाखल

१ ते ५ डिसेंबर या कालावधीत पाऊस व ताशी ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने जिल्ह्यातील मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारी साठी जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिल्याने सुरक्षित असलेल्या देवगड बंदरात स्थानिक लोकांबरोबरच मालवण गुजरात राज्यातील नौका दाखल होत आहेत.

थंडी गायब, किडरोगाचा प्रादुर्भाव होणार

नोव्हेंबर महिना हा कडक थंडीचा असतो. मात्र, यावर्षी अवकाळी पाऊस सातत्याने पडत असल्याने थंडी गायब झाली आहे. या महिन्यात आंबा, काजू कलमांना पालवी फुटून त्यानंतर मोहाेर व फळधारणा होते. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून आंबा, काजू ही कोकणी फळे बाजारात येत असतात. मात्र, यावर्षी अजूनही पाऊस सुरू असल्याने त्याचा फटका या फळांना बसणार आहे. आता पडत असलेल्या अवकाळी पावसाने किडरोगाचा प्रादुर्भाव होणार असल्याने शेतकरी आणि बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हवामान खात्याचा अचूक अंदाज

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेले दोन दिवस जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी वारे वाहत आहेत. समुद्र खवळला असल्याने मासेमारी ठप्प आहे.

Web Title: Mango and cashew crops will be affected by unseasonal rains in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.