देवगडात आंबा, तर वेंगुर्ल्यात काजू परिषद
By admin | Published: July 23, 2016 09:49 PM2016-07-23T21:49:54+5:302016-07-23T23:53:46+5:30
प्रमोद जठार : जिल्ह्यात शेततळी बांधण्याची कृषिमंत्र्यांकडे मागणी
देवगड : कृषी लागवडीला १०० टक्के अनुदान पूर्वीप्रमाणे द्यावे, कृषी अवजारांसाठी जिल्ह्याला सुमारे पाच कोटी देण्यात यावेत, जिल्ह्यातील शेततळी बांधावीत, आदी मागण्या कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केल्या आहेत. सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन संपल्यावर कृषिमंत्री देवगडमध्ये आंबा परिषद, तर वेंगुर्ल्यामध्ये काजू परिषद घेणार असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
देवगड भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, जयदेव कदम, संतोष किंजवडेकर, हर्षा ठाकूर, सदाशिव ओगले, आदी उपस्थित होते.
जठार म्हणाले की, पंतप्रधान पीक विमा योजनेमधून महाराष्ट्रमध्ये चार हजार कोटी रुपयांची रक्कम त्या त्या जिल्ह्याला वाटण्यात आली. यामधील लातूर जिल्ह्याला १६२२ कोटी, उस्मानाबाद जिल्हा १२१७ कोटी, नांदेड जिल्हा १०५१ कोटी, जालना १९०० कोटी, बीड २६१० कोटी, बुलढाणा १११८ कोटी, यवतमाळ १५१९ कोटी, रायगड ५ कोटी ५९ लाख, सिंधुदुर्गला ८ लाख, तर रत्नागिरीला ५ लाख, अशी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला पंतप्रधान पीक विमा योजनेमधील सर्वांत कमी लाभ मिळाला आहे. याचे कारण असे आहे की, या विमा योजनेमध्ये शेतकरी सहभागी झाले नाहीत. त्याचा प्रचार व प्रसार झाला नाही. कोकणामध्ये दुष्काळग्रस्त भाग नसल्याने महाराष्ट्राला लागू असलेला दर पिकाच्या जोखीम दरापेक्षा जास्त असल्याने या योजनेचा लाभ घेता आला नाही.
यामुळे कोकणच्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जोखीम दर ७० टक्क्यावरून ९० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात यावा, अशी मागणी कृषिमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. यामुळे कोकणच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पावसाळी अधिवेशन संपल्यावर कृषिमंत्री देवगडमध्ये आंबा परिषद, तर वेंगुर्ल्यामध्ये काजू परिषद घेणार असून, कृषी लागवडीसाठी १०० टक्के अनुदान पूर्वीप्रमाणे मिळावे, कृषी अवजारांसाठी जिल्ह्यासाठी साडेपाच कोटी रुपये मिळावेत, आत्मा ही कृषी संस्था नियमित करण्यासाठी त्यांना निधी देण्यात यावा, प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी ५ कोटी देण्यात यावेत, शेततळ्याची, महात्मा फुले जलसंधारणासाठी ५ कोटींची मागणी, जिल्ह्यातील नद्यांच्या गाळ उपशासाठी व कृषी विभागातील ५० टक्के असलेली रिक्त पदे भरण्यात यावी, अशा विविध मागण्या कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)
...तर याचा शेतकऱ्यांना लाभ होईल
पीक विमा योजनेमध्ये आतापर्यंत कोकणातील २९ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यामुळे कोकणाचे २८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, या योजनेचा लाभ कोकणातील शेतकऱ्यांना होण्यासाठी याची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविल्यास कोकणातील ६० हजार हेक्टर क्षेत्र आणि १ लाख २३ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे जठार यांनी सांगितले.