वाशी फळ मार्केटमध्ये आंब्याच्या दरात घसरण
By admin | Published: March 14, 2017 10:55 PM2017-03-14T22:55:56+5:302017-03-14T22:55:56+5:30
आवक वाढली : पेटीमागे चक्क दीड हजार रुपयांचा फरक
रत्नागिरी : वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंब्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी मार्केटमध्ये २२ हजार आंबा पेट्या आल्या होत्या. रविवारी व सोमवारी मार्केटला सुटी असल्याने मार्केटमध्ये शुकशुकाट होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा लवकर बाजारात आला आहे, शिवाय प्रमाणही अधिक आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारभाव कमी आहे. पेटीमागे १५०० रूपयांचा फरक असल्यामुळे शेतकरी बंधंूचे आर्थिक नुकसान होत आहे.
सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान होऊनसुध्दा लवकर थंडी सुरू झाली. त्यामुळे नोव्हेंबरपासूनच मोहोर प्रक्रियेला प्रारंभ झाला. दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढले. परिणाम पुनर्मोहोराच्या संकटामुळे आधीच्या मोहोराला आलेल्या फळांची गळ झाली. थंडी सुरू असल्यामुळे प्रत्येक झाडाला सलग तीन वेळा मोहोर आला. त्यामुळे पहिल्या दोन मोहोराचा आंबा गळून पडला. त्याचदरम्यान थ्रीप्स व कीटकांचा परिणाम आंबा पिकावर झाला. आंब्याच्या व मोहोराच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करावी लागते. कीटकनाशकांचा वापर झाडांची देखभाल यामुळे काही प्रमाणात बचावलेला आंबा उष्णतेमुळे लवकर तयार झाला. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच आंबा बाजारात आला. सुरूवातीला त्याचे प्रमाण अल्प होते. यावर्षी आंब्याचे प्रमाण नक्कीच अधिक आहे.
पंधराशे ते चार हजार रूपये दराने आंबा पेटी विक्री सुरू आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत हा दर कमी आहे. गतवर्षीपेक्षा पेटीमागे दीड हजार रूपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नोटाबंदीचा परिणाम आंबा विक्रीवर झाला आहे. कार्पोरेट सेक्टरमधून आंब्याची मागणी खालावली आहे. सध्या आखातील प्रदेशातून आंब्याची निर्यात सुरू आहे. आखाती प्रदेशातून आंब्याला चांगली मागणी असल्याने दर टिकून आहेत. पुढच्या आठवड्यापासून युरोप व अमेरिकेची निर्यात सुरू होईल. शिवाय मुंबईमध्ये उत्तरप्रदशातील भैय्येच आंब्याची विक्री करतात. उत्तरप्रदेशमधील निवडणूक नुकतीच संपली असून, होळी सण झाल्यानंतर या मंडळींचे मुंबईत आगमन होणार आहे. त्यामुळे आंब्याचा उठाव पुढच्या आठवडयापासून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सध्यातरी आंबा चांगला आहे. परंतु सुरूवातीच्या आंब्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे २० मार्चनंतर कोकणातील हापूस निर्यातीची संख्या घटेल. शेतकऱ्यांना ब्रेक घेऊन आंबा काढवा लागणार असल्याची प्रतिक्रिया आंबा बागायतदार एम. एम. गुरव यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
चांगल्या दर्जाच्या आंब्याला चांगला भाव आहे. कर्नाटक तसेच केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमधून दररोज दहा ते पंधरा हजार पेट्यांची आवक होत आहे. हापूस, लालबाग, तोतापुरी, बदामी, गुहा आदी विविध प्रकारचा आंबा विक्रीस येत आहे. मात्र, हा आंबा किलोवर विकण्यात येत आहे. कर्नाटकसह व दक्षिण भारतातील आंबा कोकण हापूसच्या बरोबर सुरू झाला. आंब्याचा दर्जा व उत्पादन दोन्ही बाबतीत कोकणच्या हापूसपेक्षा सरस आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल, अशा दरात आंबा विक्री सुरू आहे.