आंबा हंगामावर पावसाचे पाणी, शेतकरी-बागायतदार अडचणीत; दर घसरले कर्जाचे हप्ते फेडायचे कसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 07:15 PM2022-04-15T19:15:27+5:302022-04-15T19:16:08+5:30
मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका आंबा व्यवसायाला बसला होता. त्या काळात आंबा व्यावसायिकांनी विक्रीचे नवनवीन प्रयोग करून त्यातून कसा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदारांच्या नाकीदम आणले.
महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसात बदललेल्या नैसर्गिक वातावरणाचा फटका मोठ्या प्रमाणावर सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरूवारी रात्री जिल्ह्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या आंब्याच्या हंगामावर पाणी पडले आहे.
गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्यात अवकाळी पाउस पडला आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदारांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळून पडलेला अवकाळी पाऊस हा डोकेदुखी ठरतो. गेल्या वर्षभरात पावसाळ्याचे चार महिने वगळून प्रत्येक महिन्यात थोडा तरी अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे त्याचा फटका शेतकरी, बागायतदारांना बसला आहे.
आंबा डागळला, दरही उतरणार
जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून आंबा हंगामाला सुरूवात होते. यावर्षी अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता त्यामुळे थंडीही लांबली होती. परिणामी आंबा हंगाम उशिराने म्हणजे एप्रिल, मे महिन्यातच सुरू होणार हे निश्चित होते. मात्र, मार्च महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे त्याचा परिणाम आंब्याच्या फळांवर झाला आणि आता आंबा मोठ्या प्रमाणावर डागळला आहे. त्यामुळे सध्या आंब्याचे दरही घसरले आहेत.
कर्जाचे हप्ते कसे फेडायचे ?
मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका आंबा व्यवसायाला बसला होता. त्या काळात आंबा व्यावसायिकांनी विक्रीचे नवनवीन प्रयोग करून त्यातून कसा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदारांच्या नाकीदम आणले. आंब्याचे फळच खराब झाल्यामुळे आता व्यवसाय कसा होणार? आणि बँकांच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न व्यावसायिकांना सतावत आहे.
शासनाने मदत करण्याची मागणी
शासनाने आंबा, काजू बागायतदारांना आर्थिक मदत करावी आणि नैसर्गिक आपत्तीमधून वर काढण्यासाठी हातभार लावावा, अशी मागणी आंबा आणि काजू व्यावसायिकांमध्ये होत आहे. हे कोकणातील दोन महत्वाची उत्पन्नाची साधने आहेत. मात्र, तीच साधने निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून गेली आहेत. -प्रा. राजेंद्र मुंबरकर, फळ अभ्यासक, सिंधुदुर्ग