आंबा हंगाम या वर्षी लांबण्याची चिन्हे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 05:14 AM2019-11-13T05:14:49+5:302019-11-13T05:14:56+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘क्यार’ वादळ व अवकाळी पावसाचा परिणाम पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंब्याच्या मोहरावर झाला आहे.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘क्यार’ वादळ व अवकाळी पावसाचा परिणाम पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंब्याच्या मोहरावर झाला आहे. त्यामुळे यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर जाण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.
अवकाळी पावसाचा
फटका भातशेती, मच्छिमारी व्यवसायाबरोबरच आंबा बागायतदारांना बसला आहे. आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये हापूसला पहिला मोहर येतो. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फळ तयार होते व बागायतदारांनाही चांगला दर मिळतो. मात्र, पावसाने बागायतदारांच्या आशेवर पाणी फेरले आहे. सध्याच्या वातावरणामुळे आंबा कलमांना पालवी येण्याची शक्यता जास्त असून बागायतदारांना आंब्याला मोहर येण्यासाठी डिसेंबरची वाट पहावी लागणार आहे. दुसºया टप्प्यातील मोहर हा डिसेंबर- जानेवारीत येतो. त्याचे फळ एप्रिल-मेमध्ये तयार होते. हंगामाच्या शेवटी आंब्याचा दर गडगडत असल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसतो. तरीही दुसºया टप्प्यातील मोहराच्या प्रतीक्षेत बागायतदार आहे. थंडी चांगली पडली तरच दुसºया टप्प्यातील हंगाम हाताशी लागेल, असे बागायतदारांचे म्हणणे आहे.
>आम्हाला वाली कोण?
आंबा बागायतदारांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या नुकसानीतून सावरायचे कसे? असा प्रश्न असून आम्हाला कोणीच वाली नाही का? असा प्रश्न आंबा बागायतदारांकडून विचारला जात आहे.