अखेर आंबा विक्रेत्यांना हटविले, सावंतवाडी नगरपरिषदेकडून कारवाई

By अनंत खं.जाधव | Published: June 8, 2024 05:59 PM2024-06-08T17:59:17+5:302024-06-08T17:59:48+5:30

पालकमंत्र्याची मुदत राहिली बाजूला : व्यापाऱ्यांकडून नाराजीचा सूर 

Mango sellers were finally removed, action taken by Sawantwadi Municipal Council | अखेर आंबा विक्रेत्यांना हटविले, सावंतवाडी नगरपरिषदेकडून कारवाई

अखेर आंबा विक्रेत्यांना हटविले, सावंतवाडी नगरपरिषदेकडून कारवाई

सावंतवाडी : भाजी मार्केटमध्ये आणि रस्त्यावर अशा दोन्ही ठिकाणी स्टॉल घालून बसणार्‍या विक्रेत्यांना आणखी दहा दिवसांची मुदत वाढवून देण्याबाबत एकमत झाले असतनाच अचानक शनिवारी सावंतवाडी पालिकेने कारवाईचा बडगा उचलल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्काच बसला.

आंब्याच्या हंगामात बाहेर बसण्यात परवानगी देण्यात आली होती, परंतु मुदत वाढवून देऊन सुद्धा पुन्हा व्यापारी ठाम राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे म्हणणे आहे. तर पालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत व्यापार्‍यांत नाराजी असून आंबा हंगाम संपेपर्यंत किंवा वटपौर्णिमेनिमित्त तरी बाहेर बसण्याची परवानगी द्या, अशी मागणीव्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. 

सावंतवाडी शहरातील मुख्य रस्त्यावर आंबा विक्रेत्यांना बसण्यास नगरपरिषदने परवानगी दिली होती. मुदत संपल्यानंतर त्यांना उठण्यास सांगितले. पण वटपौर्णिमेपर्यत मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार दोनदा मुदत वाढवून देण्यात आली होती. तर गुरूवारी या विक्रेत्यांना उठण्यास सांगितले. पण ते ऐकत नव्हते शेवटी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना सांगून ही कारवाई टाळली होती.

पण मुदत वाढवून देण्या बाबत कोणतेही लेखी आदेश नसल्याने तसेच मुदत वाढीच्या कोणत्याही सूचना आल्या नसल्याने शनिवारी मुख्याधिकाऱ्यांनी स्टॉल खाली करून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. रस्त्यावर व्यापारासाठी बसणार्‍या सर्व व्यापाऱ्यांचे मार्केटमधील स्टॉल हटवणार आहोत, असे नगरपरिषदेच्या अधिकारी रचना कोरगावकर यांनी सांगितले.

यावेळी काही व्यापाऱ्यांकडून याला विरोध करण्यात आला, मात्र पालिका कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मार्केटमधील स्टॉल हटविले. त्यामुळे लवकरात लवकर मार्केटमध्ये येऊन व्यापार करा अन्यथा तेथील सर्व स्टॉल हटवू अशी भूमिका नगरपरिषद कडून घेण्यात आली. याबाबत व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मार्केटमध्ये आंब्यांना ग्राहक येत नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर बसावे लागत आहे. अद्याप हंगाम संपला नाही, त्यामुळे आठ दिवसांची मुदत मागितली. मात्र पालिकेकडून आक्रमक भूमिका घेतली गेली असली तरी आम्ही पुढचे आठ दिवस इथेच व्यापारासाठी बसणार आहोत असे ते म्हणाले. यावेळी अनिल मठकर, विमल पावसकर, आरती मठकर, श्याम सांगेलकर, राजा खोरागडे, दिपाली राऊळ, सुलभा जामदार, सुषमा राऊळ, रेश्मा खोडागरे आदी उपस्थित होते.

Web Title: Mango sellers were finally removed, action taken by Sawantwadi Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.