शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेचे राजकारण करणाऱ्यांना जनता घरी बसविणार, मनोज जरांगेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 03:00 PM2024-09-01T15:00:30+5:302024-09-01T15:01:04+5:30

पुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कायद्यात दुरुस्ती करा, जरांगे पाटील यांची मागणी 

Manoj Jarange Patil warns that the public will make sit at home, those who politicized the incident of chhatrapati Shivaji Maharaj statue | शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेचे राजकारण करणाऱ्यांना जनता घरी बसविणार, मनोज जरांगेंचा इशारा

शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेचे राजकारण करणाऱ्यांना जनता घरी बसविणार, मनोज जरांगेंचा इशारा

- संदीप बोडवे

मालवण: छत्रपतींचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचे युती आणि आघाडीतील सर्वच पक्षांनी राजकारण सुरू केले आहे. हा प्रकार महाराष्ट्रासाठी दुदैवी आहे. अशा घटनेचे राजकारण करणाऱ्या दोन्ही बाजूच्या पक्षांना महाराष्ट्राची जनता घरी बसविणार आहे. यातून कुणाचीही सुटका नाही, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

शनिवारी रात्री मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी मंगल कार्यालय येथे दाखल झाले होते. रविवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यांनी राजकोट येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, सतीश सावंत, सुशांत नाईक, अर्चना घारे परब, संघटनेचे पदाधिकारी व शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते. 

यावेळी जरांगे पाटील म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्या जवळच्या पवित्र भूमीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा अशा तऱ्हेने कोसळणे ही घटना मनाला वेदना देणारी आहे. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी व्हायलाच हवी. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. कुणीही दोषी असो तो तुरुंगातून सुटता नये. त्याचप्रमाणे भविष्यात महापुरुषांचे पुतळे उभारताना विशेष काळजी घेण्यात यावी. राजकोट येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायद्यात दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले. 

जनता हिशेब करणार...
छत्रपतींचा पुतळा दुर्घटनेची सध्या युती आणि आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांनी राजकारण सुरू केले आहे. दोघांनीही अशी नाटके सुरूच ठेवली तर जनता त्यांना घरी बसविणार आहे. थोड्याच दिवसात दूध का दूध, पाणी का पाणी होणार असून जनताच यांचा हिशोब करणार आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

मराठा समाज मच्छीमारांच्या बाजूने...
वाढवण बंदराच्या कामात जर मच्छिमार समाज विस्थापित होणार असेल तर महाराष्ट्रातील मराठा समाज या मच्छीमारांच्या बाजूने उभा राहणार आहे. वाढवण येथील जनआंदोलन हे मच्छीमारांच्या रोजी रोटीच्या प्रश्नासाठी आहे. या प्रकल्पाबाबत मी माहिती घेत असून सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

मी छत्रपतींचा मावळा...
मी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे या घटनेची पाहणी करणे महाराजांचे दर्शन घेणे हे माझे कर्तव्य असल्याची भावना जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

राजरत्न आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांच्यासमवेत केली पाहणी
रविवारी मालवणात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेपाटील हे राजकोट येथे पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्यासमवेत बुद्धिस्ट सोसायटीचे ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनीही या ठिकाणी भेट दिली. भीमसैनिकांनीही हजेरी लावली. यावेळी जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम, सिद्धार्थ जाधव उपस्थित होते.
 

Web Title: Manoj Jarange Patil warns that the public will make sit at home, those who politicized the incident of chhatrapati Shivaji Maharaj statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.