कणकवली पंचायत समिती सभापती पदी मनोज रावराणे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:31 PM2021-01-13T18:31:34+5:302021-01-13T18:33:27+5:30
panchayat samiti Kankavli Sindhudurg- कणकवली पंचायत समिती सभापती पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडप्रक्रियेत मनोज रावराणे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. तहसीलदार तथा पीठासन अधिकारी आर. जे.पवार यांनी ही निवड जाहीर केली आहे.
कणकवली : कणकवलीपंचायत समिती सभापती पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडप्रक्रियेत मनोज रावराणे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. तहसीलदार तथा पीठासन अधिकारी आर. जे.पवार यांनी ही निवड जाहीर केली आहे.
कणकवली पंचायत समितीमध्ये १६ पैकी १५ सदस्य राणे समर्थक आहेत. त्यामुळे ही निवडणूक पूर्णतः बिनविरोध होणार हे यापूर्वीच निश्चित झाले होते. मंगळवारी मनोज रावराणे यांच्या नावावर भाजपा नेते खासदार नारायण राणे यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यानंतर विहित प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सभापती निवड प्रक्रियेसाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत मनोज रावराणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकार्यांनी जाहीर केले.
मनोज रावराणे हे राजकीय व सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे नाव म्हणून ओळखले जाते. आमदार नितेश राणे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. नितेश राणे यांच्यासोबत युवा मोर्चाच्या माध्यमातून राजकारणात उडी घेतलेल्या मनोज रावराणे यांना तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून बहुमान मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
मनोज रावराणे यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच आनंदोत्सव साजरा केला. भाजपाचे झेंडे व फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल-ताशांच्या गजरात पंचायत समितीचा परिसर निणादून गेला होता. यावेळी लोरे, घोणसरी , वाघेरी, फोंडा आदी परिसरातील अनेक ग्रामस्थ कणकवली येथे मनोज रावराणे याना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा परिषद सभापती बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, सुजाता हळदीवे, उपसभापती दिव्या पेडणेकर, माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, पंचायत समिती सदस्या स्मिता मालडीकर, सुचिता दळवी, सुजाता हळदिवे , तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संतोष कानडे,भाग्यलक्ष्मी साटम, महेश लाड, सुभाष सावंत, माजी उपसभापती महेश गुरव, लोरे सरपंच अजय रावराणे, वाघेरी सरपंच संतोष राणे, भाजपाचे प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत,बाबासाहेब वर्देकर, स्वप्निल चिंदरकर , उपसरपंच अनंत रावराणे,तंटामुक्ती अध्यक्ष महेश रावराणे, शक्ती केंद्रप्रमुख नरेश गुरव,माजी सरपंच सुमन गुरव, आदी उपस्थित होते.
सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार !
माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व भाजपा पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थकी लावण्यात येईल. सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन कणकवली तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न राहील . अशी प्रतिक्रिया मनोज रावराणे यांनी यावेळी व्यक्त केली.