जगात शिकवणारे बरेच, पण काम करणारे कमी; भास्करराव पोरे-पाटील यांची खंत
By अनंत खं.जाधव | Published: October 30, 2023 05:36 PM2023-10-30T17:36:31+5:302023-10-30T17:36:59+5:30
सावंतवाडी : पूर्वी मावळे ३५ किलोची तलवार घेऊन फिरायचे आज माणसाचे वजन ३५ किलो भरत नाही. त्यामुळे आपल्या चुका ...
सावंतवाडी : पूर्वी मावळे ३५ किलोची तलवार घेऊन फिरायचे आज माणसाचे वजन ३५ किलो भरत नाही. त्यामुळे आपल्या चुका सुधारा. काय करू नका हे सांगण्यापेक्षा तुम्ही करून दाखवा. माझ्या पाटोदा गावात ४० ठिकाणी हात स्वच्छता मशिन ठेवली असून या ठिकाणी थूंका असे फलक लावले आहेत. जगात शिकवणारे खूप आहेत, पण करणारे कोणीच नाही, अशी खंत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्करराव पोरे-पाटील यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे रोटरी क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष सुहास सातोस्कर, सरपंचसंघटनेचे सुरेश गावडे, क्रीडाईचे अध्यक्ष निरज देसाई, दादा खोर्जुवेकर, सरपंच संघटने जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, प्रवीण परब उपस्थित होते.
पोरे-पाटील म्हणाले, स्वातंत्र्यपूर्वकाळात कुठल्याही सुविधा नसताना माणसे शंभर वर्षे जगत होती. आता माणूस ६० वर्षे जगत आहे आणि लवकर त्याचे आयुष्यमान ४० वर्षांवर येईल. याला जबाबदार कोण? सर्व सुविधा असताना हे असे का घडते, याचा विचार प्रत्येक सरपंचांनी करणे गरजेचे आहे. आजार हे प्रामुख्याने गावात झाडे नसल्यामुळे होतात. झाडामुळे ऑक्सिजनची निर्मिती होते. एका माणसाला २८ किलो ऑक्सिजन लागतो. एक झाड ७ किलो ऑक्सिजन निर्मिती करते आणि ऑक्सिजनचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने कोरोना काळात अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि ही आपत्ती पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. असेही ते म्हणाले.
माझ्या गावात मी सरपंच होण्यापूर्वी दोन दवाखाने होते. आज आमच्या गावात एकही दवाखाना नाही. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गावात स्वच्छता पाहिजे, ड्रेनेजची गटार पाहिजेत. आरोग्य चांगले राहिले तर आयुष्य नक्कीच वाढेल. या सर्वांसाठी होणाऱ्या खर्चाचे नियोजन करणे सोपे आहे.