Maratha Kranti Morchaसिंधुदुर्ग बंद आंदोलन चिघळले, कसालमध्ये धुमश्चक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 03:46 PM2018-07-27T15:46:45+5:302018-07-27T15:53:24+5:30

सकल मराठा समाजातर्फे झालेल्या सिंधुदुर्ग बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल पुलानजिक पोलीस-आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाली. यात पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि आंदोलकर्त्यांनी केलेली दगडफेक यामध्ये चार पोलीस कर्मचारी आणि आंदोलकर्ते जखमी झाल्याने बंदला गालबोट लागले.

Maratha Kranti Morcha hit Sindhudurg agitation; | Maratha Kranti Morchaसिंधुदुर्ग बंद आंदोलन चिघळले, कसालमध्ये धुमश्चक्री

Maratha Kranti Morchaसिंधुदुर्ग बंद आंदोलन चिघळले, कसालमध्ये धुमश्चक्री

Next
ठळक मुद्देदगडफेकीमध्ये चार पोलीस, दोन आंदोलकर्ते जखमीटायर जाळून, झाडे पडून रास्तारोको, एस. टी. बसही फोडल्या

सिंधुदुर्ग : सकल मराठा समाजातर्फे झालेल्या सिंधुदुर्ग बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल पुलानजिक पोलीस-आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाली. यात पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि आंदोलकर्त्यांनी केलेली दगडफेक यामध्ये चार पोलीस कर्मचारी आणि आंदोलकर्ते जखमी झाल्याने बंदला गालबोट लागले.

दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्त्यावर टायर पेटवून, झाडे तोडून, एस.टी. बसवर दगडफेक करून मराठा बांधवांनी आपला आक्रोश व्यक्त केला. कुडाळ तालुक्यात चार एस.टी. बसेस आंदोलनकर्त्यांनी फोडल्या. प्रत्येक तालुक्यात शेकडोंच्या संख्येने मराठी बांधव रस्त्यावर उतरल्याने जिल्ह्याच्या सर्वच भागातील जनजिवन विस्कळीत झाले होते.


सिंधुदुर्ग बंदच्या पार्श्वभूमिवर कसाल येथे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चकमक नंतर जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या पोलिसाने माफी मागावी यासाठी आमदार नीतेश राणे आणि वैभव नाईक यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. (छाया : विनोद परब)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलन सुरू असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संयोजकांनी गुरूवारी 'जिल्हा बंद' ची हाक दिली होती. त्यानुसार आज सकाळ पासूनच जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शांतता पसरली होती. सर्व व्यापा-यांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.

सकाळी साडे अकरा वाजता कसाल पंचक्रोशीत आंदोलक कसाल पुलानजिक जमा झाले होते. याच दरम्यान ओरोस पोलिसांची व्हॅन तेथे पोहोचली व व्हॅनमधील चालकाने मराठा आंदोलकांना जाती वरून बोलत शिवीगाळ केली. त्यामुळे आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलीस आणि आंदोलक यांच्यात धुमश्चक्री उडाली. आक्रमक झालेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

आंदोलनाची माहिती घेण्यासाठी राऊंडवर असणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम हे घटनास्थळी पोहोचले. या चकमकीत चार पोलीस कर्मचारी व दोन आंदोलक जखमी झाले. पोलीसांनी सहा आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यातील बाबा सावंत व बाळासाहेब सुर्यवंशी यांना पोलिसांनी ओरोस पोलीस ठाण्याला तर उर्वरित चार जणांना अधीक्षक कार्यालयात हलविले.

...चार पोलीस, दोन आंदोलनकर्ते जखमी

कसाल पुलाजवळ मराठा आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकांनी दगड फेक केली. यात आंदोलनकर्ते प्रशांत नामदेव सावंत (४७) व बाळासो आप्पासो सूर्यवंशी (४५) (दोन्ही किर्लोस- मालवण) आणि पोलिस कर्मचारी आशिष शेलटकर, दीपक तारी, मलिकार्जुन ऐहोळी, विठ्ठल कोयंडे हे जखमी झाले आहे. शेलटकर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात तर इतरांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांमुळे आंदोलन चिघळले : नीतेश राणे

आमदार नीतेश राणे घटनास्थळी पोहोचले. यावेळी आंदोलकांनी मोठ मोठ्या आवाजात घोषणा देत पुन्हा पोलीस ठाण्यात धाव घेतली. शेकडोंचा जमाव पोलीस ठाण्यात विविध घोषणा देत चालून गेला. यावेळी आक्रमक झालेल्या आमदार राणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पांडकर यांना धारेवर धरत तुमच्या कृतीमुळे आंदोलन चिघळले असल्याचे सांगून मराठा समाजाला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या पोलिस कर्मचारी विठ्ठल कोयंडे यांना इथे आणून सर्व मराठा समाजाची माफी मागावी असे सांगितले. अखेर कोयंडेंनी माफी मागितल्यानंतर या वादावर पडदा पडला.
 

Web Title: Maratha Kranti Morcha hit Sindhudurg agitation;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.