Maratha Kranti Morcha : सिंधुदुर्ग : मराठा समाजात फूट, दोन स्वतंत्र मोर्चे निघाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:26 PM2018-07-26T14:26:59+5:302018-07-26T15:45:11+5:30
आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या जिल्हा बंदला वैभववाडी तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान शहरातून आरक्षण समर्थन मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, मराठा समाजात फूट पडली असून दोन स्वतंत्र मोर्चे निघाले, स्वाभिमानतर्फे मोर्चा काढून टायर जाळले, मराठा आरक्षण समर्थन जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वैभववाडी(सिंधुदुर्ग): मराठा आरक्षण समर्थनार्थ जिल्हा बंदला वैभववाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, दोन स्वतंत्र मोर्चे निघाल्याने दुहीचे दर्शन घडले. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील पहिला मोर्चा विसर्जित झाल्यानंतर स्वाभिमान पक्षाच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मागणी मोर्चा निघाला.
यावेळी तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी लगेच टायर हटविल्यामुळे वाहतूकीवर फारसा परिणाम झालेला नाही. तत्पूर्वी अज्ञातानी महामार्गावर टाकलेले झाड पोलीस व प्रवाशांनी हटवले.
संभाजी चौकातून सकाळी 11 वा स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. तेथून घोषणा देत मासळी बाजार ते सुकनदी अशी फेरी काढून अर्जुन रावराणे विद्यालयानजिक तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळण्यात आले. यावेळी 'आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे', 'अरे नागपूरचा पोपट काय म्हणतो, मराठ्यांना आरक्षण नाय म्हणतो' अशा घोषणा देण्यात आल्या.
दुस-या मोर्चाचे नेतृत्व अरविंद रावराणे, विकास काटे, महेश रावराणे दिगंबर पाटील यांनी केले. या मोर्चात नासीर काझी, पुंडलिक साळुंखे, सुनिल रावराणे, शुभांगी पवार, प्राची तावडे, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, नगरसेवक रवींद्र रावराणे, हुसेन लांजेकर, आदी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.