Maratha Kranti Morcha : युवकाला मारहाणीने आंदोलन चिघळले, पोलिसांकडून दिलगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 03:05 PM2018-07-27T15:05:11+5:302018-07-27T15:10:14+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग बंद आंदोलनावेळी आंदोलनकर्त्या युवकाला मारहाण झाल्यामुळे आंदोलन चिघळले होते. मात्र, पोलीस निरीक्षक जगदीश काकडे यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले.

Maratha Kranti Morcha: Youth wins agitation, police apologizes | Maratha Kranti Morcha : युवकाला मारहाणीने आंदोलन चिघळले, पोलिसांकडून दिलगिरी

Maratha Kranti Morcha : युवकाला मारहाणीने आंदोलन चिघळले, पोलिसांकडून दिलगिरी

Next
ठळक मुद्देयुवकाला मारहाणीने आंदोलन चिघळले, पोलिसांकडून दिलगिरी चार बसेसच्या काचा फोडल्या, कुडाळ तालुक्यात कडकडीत बंद

कुडाळ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग बंद आंदोलनावेळी आंदोलनकर्त्या युवकाला मारहाण झाल्यामुळे आंदोलन चिघळले होते. मात्र, पोलीस निरीक्षक जगदीश काकडे यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले.

आंदोलनादरम्यान तालुक्यातील महामार्ग तसेच अनेक गावातील रस्त्यांवर टायर जाळून व मोठी झाडे कापून टाकत वाहतूक रोखण्यात आली. तर चार एसटी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच सहा बस गाड्या रोखून धरण्यात आल्या होत्या. उद्योग, व्यवसाय, वाहतूक सेवा बंद असल्यामुळे तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.


गुरुवारी होणाऱ्या या बंदच्या अगोदरच कुडाळ तालुक्यातील महामार्ग तसेच इतर काही गावांतील रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक ठप्प केली. तसेच कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या दरवाजाच्या व खिडक्यांच्या काचा फोडून उग्र स्वरुपाची मात्र गनिमी काव्याने आंदोलने छेडण्यात आली. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.

गुरुवारी सकाळपासूनच या आंदोलनासाठी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मराठा समाजबांधव व भगिनी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयासमोरील एस. एन. चौकामध्ये जमायला सुरुवात झाली.

यावेळी क्रांती मोर्चाचे संयोजक अ‍ॅड. सुहास सावंत, आमदार वैभव नाईक, कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, संजय पवार, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, नागेंद्र परब, धीरज परब, प्रफुल्ल सुद्रीक, बंड्या सावंत, दादा साईल, राजू राऊळ, संग्राम सावंत, बाबल गावडे, दीपक गावडे, सुभाष परब, पंचायत समिती सदस्य जयभारत पालव, रत्नाकर जोशी, सचिन काळप, अभय परब, किशोर मर्गज, दीपक आंगणे, रुपेश कानडे, भूषण राणे, संध्या तेरसे, साक्षी सावंत, अश्विनी गावडे, नीता राणे तसेच इतर मराठा समाजबांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. सुहास सावंत यांनी सांगितले की, कुडाळमधील सर्व समाजबांधवांनी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य केले. त्यामुळे या तालुक्यात १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला असून आपणही शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले.

या आंदोलनादरम्यान उपस्थित सर्व आंदोलनकर्त्यांनी एस. एन. देसाई चौकापासून कुडाळ पोलीस ठाणे, जिजामाता चौक, गांधी चौक, बाजारपेठ, पान बाजार, कुडाळ नवीन एसटी डेपो व पुन्हा महामार्गावरून एस. एन. देसाई चौक अशी रॅली काढली.

या रॅलीवेळी एक मराठा, लाख मराठा,छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण न देणाऱ्या सरकारचा निषेध असो अशा प्रकारच्या घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला.

या रॅलीदरम्यान काळप नाका येथील महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी खाली बसत ठिय्या आंदोलन छेडले. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या आंदोलनामुळे तालुक्यातील काही शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर काही शाळा सुरू होत्या. मात्र, मुले आली नव्हती. तसेच काही शाळा लवकर सोडून देण्यात आल्या.

हे आंदोलन शांततेत चाललेले असताना माणगाव खोऱ्यातील भूषण धुरी या युवकाने आपल्याला पोलिसांनी पिंगुळी येथील महामार्गावरून जात असताना मारहाण केल्याचे कुडाळ येथील आंदोलनकर्त्यांना सांगितले असता येथील आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. जोपर्यंत मारहाण करणारे पोलीस याठिकाणी येऊन माफी मागत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबविणार नसून हे आंदोलन अधिकच भडक करू, असा इशारा पोलीस प्रशासनाला दिला.

मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेधही व्यक्त केला.
यावेळी संतप्त झालेल्या सर्व आंदोलनकर्त्यांना या मारहाण प्रकरणी कुडाळचे पोलीस निरीक्षक जगदीश काकडे यांनी आंदोलनस्थळी येतो म्हणून सांगितले. मात्र, पाऊण तास लोटला तरी ते आले नसल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरण्याचा निर्णय घेतला.

यावेळी आमदार नाईक, अ‍ॅड. सुहास सावंत व संजय पवार यांनी पोलीस निरीक्षक काकडे यांना याठिकाणी येण्यास सांगत याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नसल्याची खात्री दिली.

कुडाळात कडकडीत बंद; एसटी गाड्यांचे मोठे नुकसान

मराठा समाजाने पुकारलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील एसटी बस वाहतूक, बाजारपेठा, रिक्षा वाहतूक, कुडाळ एमआयडीसीमधील उद्योगधंदे तसेच तालुक्यातील माणगाव खोरे, पाट, कडावल, ओरोस, कसाल तसेच इतर ठिकाणच्या सर्व बाजारपेठांत उद्योग व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला होता.


 सिंधुदुर्ग जिल्हा बंद आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, बुधवारी मध्यरात्री अज्ञात आंदोलनकर्त्यांनी हिर्लोक व कुसगाव येथे वस्तीला असलेल्या चार एसटी बसेसच्या काचा फोडल्या. तर काहींनी काही गावांमधील रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करीत बुधवारीच आंदोलनाला प्रारंभ केला.

या आंदोलनामध्ये आमदार वैभव नाईक यांनी सकाळपासून आंदोलन संपेपर्यंत उपस्थिती लावली होती. तसेच या रॅलीमध्ये ते सहभागीही झाले होते. आंदोलनकर्त्या युवकाला झालेल्या मारहाणप्रकरणी पोलीस निरीक्षक काकडे यांनी आंदोलनस्थळी येत भूषण धुरी या युवकाला जवळ घेत मारहाण प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली असून आम्हीही त्यांना मोठ्या मनाने माफ केले, अशी माहिती सुहास सावंत यांनी यावेळी देत आंदोलन संपल्याचे जाहीर केले.
 

Web Title: Maratha Kranti Morcha: Youth wins agitation, police apologizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.