मराठा मोर्चा तीन लाखांवर जाईल
By admin | Published: October 18, 2016 11:46 PM2016-10-18T23:46:35+5:302016-10-18T23:46:35+5:30
सुहास सावंत : जिल्ह्यातील २३ आॅक्टोबरच्या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात
कुडाळ : ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर २३ आॅक्टोबर रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन अंतिम टप्प्यात सुरु असून, ३ लाखांच्या विक्रमी संख्येचा हा मोर्चा निघेल, अशी माहिती या मोर्चाचे संयोजन समितीचे पदाधिकारी अॅड. सुहास सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली.
पत्रकात सावंत यांनी संयोजन समितीच्यावतीने सांगितले की, महाराष्ट्र आणि राज्याबाहेरही मराठा क्रांती मोर्चांना जसा प्रतिसाद लाभत आहे, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक मराठा बांधव सुद्धा या सुवर्ण दिवसाच्या प्रतीक्षेत आहे. गेला महिनाभर दर शनिवारी जिल्हा नियोजन बैठक आणि दर रविवारी तालुकानिहाय नियोजन बैठका सुरू आहेत.
या बैठकांतून होणाऱ्या नियोजनातून जिल्हाभर सुरुवातीला विभागीय मेळावे घेण्यात आले. त्यानंतर गाववार बैठकांचे नियोजन करण्यात आले. या आठवड्यात वाडीवार बैठका पूर्ण करून मोर्चात सामील होण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासोबत विशेष अशा महिला सभा सुद्धा या नियोजनासाठी घेण्यात आल्या.
मोर्चातील प्रमुख मागण्या या आरक्षण, इ. बी. सी. सवलत अशा असल्याने भविष्यात विद्यार्थीवर्गाला त्याचा होणारा फायदा लक्षात आल्याने विद्यार्थी वर्ग सजग झाला असून, स्वयंस्फूर्तीने मोर्चाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवकाची भूमिका बजावण्याची तयारी करत आहेत. युवक मंडळी गाड्या-गाड्यांवर भगवे झेंडे फडकावत ठिकठिकाणी रॅली काढून मोर्चाविषयी जनजागृती करत आहेत.
मोर्चासाठी जिल्ह्यातून सुमारे पाच हजार स्वयंसेवकांनी कार्यालयाकडे नावनोंदणी केलेली असून, त्यांच्यासाठी प्रशिक्षण व्यवस्था सुरु करण्यात आलेली आहे. १६ आॅक्टोबर रोजी कणकवली-देवगड-वैभववाडी या तालुक्यातील स्वयंसेवकांसाठी मराठा मंडळ सभागृह कणकवली, १८ आॅक्टोबर रोजी सावंतवाडी- दोडामार्ग- वेंगुर्लेसाठी डी. के. टुरिझम सावंतवाडी येथ प्रशिक्षण झाले. १९ आॅक्टोबर रोजी सिंधुदुर्गनगरी शरद कृषी भवन येथे कुडाळ, मालवण तालुक्यातील स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण होणार आहे.
जिल्ह्यातील मोर्चात त्यामुळे अपेक्षित अशा ३ लाखांच्या विक्रमी संख्येचा हा मोर्चा निघेल, असा विश्वास संयोजन समितीने व्यक्त केला आहे. मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्ग या नियोजित मोर्चासाठी जिल्ह्यातून येणारी संख्या विचारात घेता जास्तीत जास्त गाड्यांची व्यवस्था गरजेची आहे. जिल्ह्यातील सर्वच गाडी व्यावसायिक मंडळींनी आपल्या गाड्या मोचार्साठी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन सुद्धा समितीकडून करण्यात आलेले आहे, असे सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील अंतिम नियोजन बैठक २0 ला
मराठा क्रांती मोर्चा नियोजनाची अंतिम व्यापक बैठक २० आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शरद कृषी भवन येथे होणार असून, या बैठकीत तालुकानिहाय पार्किंग व्यवस्था, मोर्चासंबंधी सर्व प्रकारच्या व्यवस्थांचे नियोजन पूर्ण करण्यात येणार आहे. शिवाय त्याचे सादरीकरणही करण्यात येणार आहे.
इतर धर्म, समाज यांचा पाठिंबा
जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, जैन इतर समाजातील अनेकांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला असून, मोर्चासाठी आपले योगदान जाहीर केलेले आहे. त्या सर्व बांधवांना जिल्ह्यातील तमाम मराठा बांधवांकडून जाहीर पाठींबा मिळत असल्याने मोर्चाला पाठबळ मिळाले आहे.