Maratha Reservation : पुन्हा एकदा एक मराठा, लाख मराठा नारा घुमणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 05:52 PM2018-07-30T17:52:47+5:302018-07-30T17:59:19+5:30
जिल्ह्यात मराठ्यांचा आवाज घुमणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ९ आॅगस्ट या क्रांतीदिनी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
ओरोस : न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घ्यावेत आणि पोलिसांच्या दडपशाही विरोधात तसेच शासनाला या आंदोलनाची तीव्रता दाखविण्यासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यात मराठ्यांचा आवाज घुमणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ९ आॅगस्ट या क्रांतीदिनी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असून जेलभरो आंदोलनात मराठा समाजाने आपल्या कुटुंबासह सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक अॅड. सुहास सावंत यांनी यावेळी केले.
मराठा आंदोलकांवर जिल्हा पोलीस दलाकडून अन्यायकारक पद्धतीने दाखल केलेल्या गुह्यांबाबत चर्चा करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ओरोस येथे सकल मराठा समाजाची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक अॅड. सुहास सावंत, विक्रांत सावंत, डॉ. प्रवीण सावंत, सतीश सावंत, अशोक सावंत, प्रभाकर सावंत, पुष्पसेन सावंत, जान्हवी सावंत, नागेंद्र परब, धीरज परब यांच्यासह सकल मराठा बांधव उपस्थित होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कसाल पुलाजवळ पोलीस व आंदोलक यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी मराठा समाज कार्यकर्त्यांचे अटकसत्र पोलिसांनी सुरू केले असून ओसरगाव येथील आणखी तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकंदरीत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून आंदोलन मोडून काढण्याचा पोलीस प्रशासनाचा घाट आहे.
कसाल पूल येथे झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी २५ जणांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे केवळ २५ जणांवर गुन्हे दाखल न करता सर्व मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करा. ओसरगांव कानसळीवाडी येथे पोलिसांच्या भीतीपोटी अनेक मुले, युवक घरापासून दूर आहेत.
पोलीस अटक करतील या भीतीने ते घरी जात नाहीत. त्यामुळे जिल्हा पोलिसांनी त्या २५ आंदोलकांची नावे जाहीर करावीत. २५ आंदोलकांमध्ये काही विद्यार्थी असल्याने त्यांचे भवितव्य पाहता त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
शासकीय नोकरीमध्ये असलेला मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाला नाही. त्यांना आता या आंदोलनात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न व्हावेत आदी विषयांवर या तातडीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी अॅड. सावंत म्हणाले, धुमश्चक्री प्रकरणातील नावे कमी होतीलच. परंतु रविवारी घेण्यात आलेल्या बैठकीत आंदोलकांची नावे जिल्हा पोलिसांनी जाहीर करावीत. आम्ही त्यांना हजर करतो. मात्र, ते ती जाहीर करीत नसल्यास आम्ही देतो ती नावे त्यांनी घ्यावीत. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली जाणार आहे. अटकपूर्व जामीन घेणार नसल्याचे सांगून नावे जाहीर करण्यास सांगितले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कोणीही घाबरु नये : सुहास सावंत
कसाल पुलाजवळ झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी मराठा तरुणांना अटक केली जात असून ओसरगाव कानसळीवाडी येथे पोलीस जाऊन दडपशाही करीत आहेत. त्यामुळे तेथे भितीचे वातावरण निर्माण झाले असून मराठा तरुण आपल्या घरी जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे रविवारी मराठा क्रांती मोर्चा संयोजकांनी त्या ठिकाणी जात परिस्थितीचा आढावा घेतला आणि कोणीही घाबरून जावू नये असे आवाहन केले. यावेळी अॅड. सुहास सावंत, विक्रांत सावंत, सतीश सावंत आदी मराठा बांधव उपस्थित होते.