Maratha Reservation : सिंधुदुर्ग : जेलभरो आंदोलनात लाखो बांधव सहभाग घेणार, सुहास सावंत यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:00 PM2018-08-08T17:00:14+5:302018-08-08T17:03:46+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनात जिल्ह्यातून सुमारे १ लाख मराठा बांधव-भगिनी सहभागी होणार असून हे आंदोलन सर्व तालुक्यांच्या पोलीस ठाण्यांसमोर करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक अॅड. सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनात जिल्ह्यातून सुमारे १ लाख मराठा बांधव-भगिनी सहभागी होणार असून हे आंदोलन सर्व तालुक्यांच्या पोलीस ठाण्यांसमोर करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक अॅड. सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संपूर्ण राज्यात सकल मराठा समाज क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वय समितीच्यावतीने जेल भरो व महाराष्ट्र बंद आंदोलन ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनी पुकारण्यात आले असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी धीरज परब, भास्कर परब, संग्राम सावंत, डॉ. दीपाली काजरेकर, प्रशांत राणे, दिनेश म्हाडगुत तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सावंत म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता सकल मराठा समाज क्रांती मोर्च्याच्यावतीने राज्यभर ५४ ठिकाणी मूकमोर्चे काढण्यात आले.
या मूक मोर्चानंतर सरकारने राज्य मागास आयोगाची निर्मिती केली. तरीही राज्य सरकार व राज्य मागास आयोगाने आरक्षण देण्याबाबत कोणताच निर्णय दिलेला नसून केवळ चालढकलपणा करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी उग्र आंदोलने झाली होती. मराठा आमदार व आंदोलनकर्त्यांच्या दबावामुळे सरकारने ७२ हजार नोकरी भरतीला स्थगिती दिली आहे, असे असूनही आरक्षणाबाबत कोणताच निर्णय सरकारने जाहीर केला नाही.
त्यामुळे ९ आॅगस्टला महाराष्ट्र बंद व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे तसेच प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने जुलैच्या सिंधुदुर्ग बंदमध्ये ओसरगाव येथे शांततेत सुरू असलेले आंदोलनादरम्यान केलेल्या दडपशाहीचा निषेध तसेच आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी हे जेलभरो आंदोलन छेडण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद विभागातून प्रत्येकी दोन हजार आंदोलनकर्ते सहभागी होणार असून, एकूण १ लाख आंदोलनकर्ते यात सहभागी होणार असल्याचे सावंत म्हणाले. मराठा समाजाने या अगोदर केलेल्या सर्व आंदोलनाला इतर समाजबांधवांनी चांगला पाठिंबा देऊन सहकार्य केले. ९ रोजीच्या आंदोलनातही सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. आंदोलनाला कृती समिती कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनने पाठिंबा दिल्याचे सावंत यांनी सांगितले.
आंदोलन शांततेत होणार
कुडाळ येथे ९ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळ नवीन एसटी डेपो, गांधीचौक, जिजामाता चौक व पोलीस ठाणे रॅली काढण्यात येईल. त्यानंतर जेल भरो आंदोलन छेडण्यात येईल. हे आंदोलन शांततेत केले जाणार असून यावेळी कोणत्याही प्रक्षोभक घोषणा दिल्या जाणार नाहीत. तसेच कोणीही तोडफोड करणार नसून रस्तेही अडविण्यात येणार नसल्याचे सावंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बंद आंदोलन होईल, मात्र ते एच्छिक असेल. आंदोलन शांततेत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.