सिंधुदुर्गात मराठा वादळ

By admin | Published: October 24, 2016 12:05 AM2016-10-24T00:05:55+5:302016-10-24T00:05:55+5:30

रचला नवा इतिहास : मूक मोर्चासाठी अडीच लाख मराठा बांधवांची विक्रमी उपस्थिती

Maratha storm in Sindhudurg | सिंधुदुर्गात मराठा वादळ

सिंधुदुर्गात मराठा वादळ

Next

सिंधुदुर्गनगरी : गेले पंधरा दिवस सोशल मीडिया आणि सर्वच प्रसारमाध्यमांतून जिल्ह्यातील घराघरांत पोहोचलेल्या मराठा क्रांती मोर्चाने सिंधुदुर्गनगरीत नवा इतिहास रचला. आॅक्टोबर महिन्यातील कडक ऊन असतानाही अडीच लाखांवर उपस्थिती दर्शवत मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत अभूतपूर्व ऐक्याचे विराट दर्शन घडविले.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यात मराठा समाज मोर्चांची मालिकाच सुरू झाली. सिंधुदुर्गला या मालिकेत २९ वे स्थान मिळाले. शिवरायांच्या भूमीतील मोर्चाबाबत सर्वांना उत्सुकता होती. वातावरणात उष्मा वाढला असतानाही त्याची तमा न बाळगता लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी एकत्र येऊन नि:शब्द हुंकार दिला.मोर्चासाठी ‘मी मराठा’ असे शब्द लिहिलेल्या भगव्या टोप्या, हातात मराठा क्रांतीचे निशाण असलेले भगवे ध्वज, त्या भगव्या झेंड्यावर छत्रपती शिवरायांची छबी अशा दिमाखदार वातावरणाने रविवारचा दिवस मराठामय होऊन गेला होता.
सकाळी बरोबर १०.४० वाजता ओरोस फाटा येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला तन्वी कदम, सानिया सावंत, यशिका परब, पूजा सावंत, प्राची कोकितकर या मराठा भगिनींनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. शैक्षणिक मागासलेपणामुळे पेटून उठलेला मराठा समाज रस्त्यावर उतरला. यापुढे आता हे सहन करणार नाही आणि आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थही बसणार नाही, असा वज्र निर्धार मोर्चेकऱ्यांनी केला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नंतर नजीक असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल मैदानामध्ये गोळा झाला. या मैदानात १ लाख ६० हजारांपर्यंत मोर्चेकरी सामावले होते.
नेत्यांची उपस्थिती
मोर्चात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, सेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार शिवराम दळवी, युवा नेते संदेश पारकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, अशोक सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार विजय सावंत, मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, संदीप कुडतरकर आदी सहभागी झाले होते.
 

Web Title: Maratha storm in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.