खंबाटातील मराठी कामगारांना देशोधडीला लावले! आमदार नीतेश राणे यांची विनायक राऊतांवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 07:01 PM2019-04-03T19:01:17+5:302019-04-03T19:05:06+5:30
खंबाटा एव्हीएशन कंपनीमध्ये भारतीय कामगार सेना मान्यताप्राप्त संघटना आहे. मान्यताप्राप्त संघटनेची सही कामगार करारावर असते. त्यामुळे विनायक राऊत यांनी जनतेला अर्धसत्य सांगू नये. खंबाटा
कणकवली : खंबाटा एव्हीएशन कंपनीमध्ये भारतीय कामगार सेना मान्यताप्राप्त संघटना आहे. मान्यताप्राप्त संघटनेची सही कामगार करारावर असते. त्यामुळे विनायक राऊत यांनी जनतेला अर्धसत्य सांगू नये. खंबाटा कंपनीतील पगारवाढ महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेमुळे झाली होती. मात्र, भारतीय कामगार सेना व विनायक राऊत यांनी या कंपनीतील मराठी कामगारांना देशोधडीला लावले आहे, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.
कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस विहंग दळवी उपस्थित होते. यावेळी आमदार नीतेश राणे म्हणाले, खंबाटा कंपनीतील कामगारांच्या घामाचा पैसा त्यांना मिळू शकला नाही. याला विनायक राऊतच जबाबदार आहेत. या कामगारांच्या पैशासंदर्भात महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेने कामगार न्यायालयात दावा दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार किरण पावसकर, अंजली दमानिया यांनीसुद्धा राऊत यांनीच खंबाटामधील कामगारांना देशोधडीला लावल्याचा आरोप यापूर्वी केला आहे.
असे सांगतानाच आमदार राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबतची व्हिडीओ क्लिप तसेच खंबाटा कंपनीच्या कामगारांचा सुमारे २ हजार कोटींचा पगार दिला नसल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता त्याची व्हिडीओ क्लिपही यावेळी पत्रकार परिषदेत दाखविली. आमदार नीतेश राणे पुढे म्हणाले, भारतीय कामगार सेना या मान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकाºयांची सही कामगार करारावर आहे. खंबाटा कंपनीतील पगारवाढ महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेमुळे झाली होती. कामगारांना पगारावाढीचा तिसरा हप्ता मिळणार होता.
मात्र, भारतीय कामगार सेना युनियन लीडर विनायक राऊत यांनीच पगारवाढ देऊ नये असे पत्र व्यवस्थापनाला दिले आहे. त्यामुळे २०१४ सालचे प्रतिकामगार २ हजार रुपये असे १ हजार ६७३ कामगारांचे पैसे शिल्लक राहिले आहेत. राऊत यांनी दिलेले पत्र लवकरच जाहीर करू तसेच त्या पत्राच्या ५ लाख प्रति मतदारसंघात आम्ही वाटू. त्यामुळे नेमके सत्य जनतेसमोर येईल.
खंबाटा प्रकरणी सध्या ईडीची चौकशी सुरू आहे. त्यातूनही सत्य बाहेर येईल. खंबाटा कंपनीच्या गरीब कामगारांच्या पगाराचे पैसे राऊत यांनी त्यांना मिळवून द्यावेत. अन्यथा राऊतांच्या जाहीर सभेतच खंबाटा कामगार त्यांना त्याबाबत जाब विचारतील, असेही आमदार नीतेश राणे यांनी यावेळी सांगितले.