वैभव नाईकांच्या समर्थनात मोर्चा: अरविंद सावंतांसह पंधरा जणांवर कुडाळमध्ये गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 01:42 PM2022-10-20T13:42:48+5:302022-10-20T13:43:26+5:30
मात्र आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
कुडाळ: आमदार वैभव नाईक यांची लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सुरू केलेल्या चौकशीच्या विरोधात कुडाळ येथे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. प्राथमिक १५ जणांवर हे गुन्हे दाखल झाले आहेत. या संदर्भात पोलीस व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून अन्य कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश लागू केला आहे. असे असताना आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत सुरू असलेल्या चौकशीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने कुडाळ येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून मनाई आदेशाचे उल्लंघन करण्यात आले.
मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख राजन नाईक, गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संतोष शिरसाट, रुपेश पावसकर, अतुल बंगे, संदेश पारकर, जान्हवी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक तेजस्वी शिंदे यांनी शासकीय तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करत असताना मोर्चाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून अन्य कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
वैभव नाईकांना वगळले?
या मोर्चामध्ये आमदार वैभव नाईक हे सहभागी झाले होते आणि यासंदर्भातील व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहेत. मात्र कुडाळ पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.