सागरी सुरक्षा रामभरोसे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2015 11:36 PM2015-11-25T23:36:36+5:302015-11-25T23:36:36+5:30
रत्नागिरीतील चित्र : १० पैकी दोनच गस्तीनौका कार्यरत; ३६ लॅँडिंग पॉइंटवर सीसीटीव्ही बसविणार : वायकर
रत्नागिरी : दहापैकी केवळ दोनच गस्तीनौका कार्यरत असल्याने रत्नागिरीची सागरी सुरक्षा रामभरोसेच असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केलेल्या पाहणीत पुढे आले. मुंबईतील २६/११ च्या अतिरेकी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी बुधवारी सकाळी दीड तास भगवतीबंदर जेटी परिसरात सागरी सुरक्षिततेची झाडाझडती घेतली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सागरी हद्दीतील ३६ लॅँडिंग पॉइंट व अन्य संवेदनशील ठिकाणी एक कोटी खर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, अशी घोषणा वायकर यांनी केली.
२६/११ ला अतिरेक्यांनी सागरी सुरक्षा भेदून मुंबईत प्रवेश केला व अंदाधुंद गोळीबार केला होता. त्याआधी रायगडच्या दिघी येथे स्फोटके उतरवून मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत सागरी सुरक्षा भक्कम करण्यावर शासनाने भर दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर गस्तीसाठी विविध खात्यांच्या मिळून दहा वेगवान गस्तीनौका पुरविण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील केवळ दोन नौका सुरू असल्याचे पालकमंत्र्यांना तपासणीत आढळून आले.
जिल्ह्याची सागरी सुरक्षा भक्कम असणे आवश्यक असल्याने पोलीस दलाला आवश्यक साधने उपलब्ध करून दिली जातील. सागरी गस्तीनौकांना इंधन उपलब्ध करून दिले जाईल, असे वायकर यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी गस्तीनौकांवर काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी यावेळी जाणून घेतल्या. भगवती बंदरातील विविध खात्यांच्या गस्तीनौका बंद का आहेत, याबाबत त्यांनी त्या खात्यांकडून अहवाल मागविला आहे. तब्बल दीड तास त्यांनी गस्तीनौकेतून सागरी सुरक्षिततेची पाहणी केली. समुद्रात त्यांनी मच्छिमारांशीही संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, तहसीलदार हेमंत साळवी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती खोडके उपस्थित होते.
मिरकरवाडा परिसरातील स्वच्छता व्यवस्थेचादेखील त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी या परिसरात नगरपरिषदेने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची सूचना केली. (प्रतिनिधी)
आधुनिक शस्त्रे आणि पेट्रोल पंप
सागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस दलास वाढीव मनुष्यबळाबरोबरच आधुनिक हत्यारे उपलब्ध करून देण्यात येतील. गस्तीनौकांसाठी इंधन उपलब्ध व्हावे याकरिता पेट्रोल पंप उभारण्याचा पोलीस दलाचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही वायकर यांनी दिले आहे.