मुख्यमंत्र्यांपेक्षा ‘मेरीटाईम बोर्ड’ मोठे आहे का?
By admin | Published: September 5, 2015 11:49 PM2015-09-05T23:49:02+5:302015-09-05T23:50:32+5:30
आरोंदावासीयांचा सवाल : गणेश विसर्जनाचा रस्ता खुला करा अन्यथा उपोषण करणार
सावंतवाडी : आम्हाला व्हाईट आर्चिड कंपनीने वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये नाहक गुंतवले असून आरोंदावासीय कंपनीच्या जागेतून जाणार नाहीत. गणेश विसर्जनाचा रस्ता खुला करावा, अन्यथा सनदशीर मार्गाने उपोषणाचा मार्ग पत्करू, असा इशारा आरोंदा सरपंच उमा बुडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या लादलेल्या आदेशांचे पालन गाववासीयांनी करावे. मग मेरीटाईम बोर्डला रस्ता खुला करून देण्याचे आदेश असताना ते का पाळत नाहीत? मुख्यमंत्र्यापेक्षा मेरीटाईम बोर्ड मोठे आहे का, असा प्रश्नही ग्रामस्थांनी केला.
आरोंदावासीयांनी गणेश उत्सवाच्या काळात जेटीवर घातलेली भिंत काढून टाकावी, अन्यथा ती आम्ही पाडू, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर येथील उपविभागीय कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच उमा बुडे, उपविभागीय अधिकारी उत्तम चौरे, पोलीस निरीक्षक रणजित देसाई, प्रभारी तहसीलदार बी. बी. जाधव, उपविभागीय अभियंता अनामिका जाधव, बांदा पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे, आरोंदा ग्रामस्थ अशोक देसाई, बाळ आरोंदेकर, विष्णू नाईक, शुभांगी नाईक, बाळ हरमलकर, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी आदी यावेळी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी इनामदार यांनी कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने आरोंदा ग्रामस्थांनी सनसदशीर मार्गाने आपली भूमिका मांडावी. अन्यथा आम्हाला तेथे १४४ कलमाचा वापर करावा लागेल, असा इशारा दिला. मात्र, आरोंदावासीयांच्यावतीने अशोक नाईक यांनी कोणताही अनुचित प्रकार आमच्याकडून होणार नसल्याचे स्पष्ट केले. तर सरपंच उमा बुडे यांनी गणेश उत्सवाच्या काळात कंपनीने घातलेली भिंत काढावी. आम्हाला गणेश विसर्जन करण्यास बराच अडथळा येतो. तसेच बांधकाम विभागाने ग्रामपंचायतला विश्वासात न घेता रस्ता मेरीटाईमकडे कसा वर्ग केला, असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी विचारला. त्यावर प्रांताधिकारी यांनी हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा असून ३० मार्च २०१५ ला याबाबत बैठक झाली. त्यात जीआर काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळीच हा रस्ता ग्रामस्थांनी खुला करावा, तेथे गणेश विसर्जन करण्यास द्यावे, अशा अटी घालण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, बांधकाम विभागाने मेरीटाईमकडे रस्ता वर्ग केला, तरीही मेरीटाईम बोर्ड हुकुमशाही पद्धतीने ग्रामस्थांशी वागत असून रस्ता खुला करण्यास सांगूनही ते खुला करीत नाहीत. मग मेरीटाईम विभागाला मुख्यमंत्र्याचे आदेश लागत नाही का, असा सवालही ग्रामस्थांनी केला. पर्यटन विभागाची आरोंदा खाडीतील बोट अन्यत्र का हलवण्यात आली, यावर मेरीटाईम विभागाचे एस. आर. वेंगुर्लेकर यांनी या बोटीला परवानगी घेतली गेली नसल्याने बोट काढण्यात आली. सध्या ती तारकर्ली येथे असल्याचे स्पष्ट केले.
आरोंदा येथील गणेश विसर्जनासाठी भिंत खुली करावी, असे आदेश आम्हाला प्राप्त झाले नाहीत. तसेच आयएफसी कोडप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने याबाबतचा सर्व निर्णय वरिष्ठ कार्यालय घेते. त्याबाबत आम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहार करू, असे स्पष्ट केले. तर ग्रामस्थांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. अन्यथा आपण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)