पुन्हा एकदा मार्केटिंगचा जलवा!

By admin | Published: February 12, 2015 11:45 PM2015-02-12T23:45:01+5:302015-02-13T00:53:58+5:30

राजापूर तालुका : जिल्हाभरात नव्या नॉन बँकिंग संस्थेचे जाळे

Marketing again! | पुन्हा एकदा मार्केटिंगचा जलवा!

पुन्हा एकदा मार्केटिंगचा जलवा!

Next

विनोद पवार - राजापूर -झटपट पैसा मिळवण्याचे साधन म्हणूनच कोकणवासीयांच्या मनावर अनेक मार्केटिंग कंपन्यानी राज्य केले. प्रत्येकवेळी फक्त बाटली बदलायची अन् तेच औषध घेऊन बाजारात यायचे. यामुळे कोकणातून या कंपन्यांनी आणि त्यांच्या दलालानी करोडो रुपयांची माया कमवत पोबारा केला आहे. सध्या जिल्ह्यात असाच एक फंडा लॉटरीच्या माध्यमातून सर्वत्र ड्रॅगनसारखा फिरत आहे. कधीतरी आपल्या घरी लक्ष्मी येईल, या आशेवर असणाऱ्यांची पुन्हा घोर फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या तीन दशकांत अशा कंपन्यांमधून मोठी गुंतवणूक करण्यात आली. मात्र, कंपन्यांनी या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याने गुंतवणूकदारांची निराशा झाली. कल्पवृक्षने सर्वत्र एकच हंगामा केला होता. त्यानंतर आलेल्या पिअरलेस, संचयनी, संजीवनी, सॅफरान, पर्लस् ग्रीन, फॉरेस्ट ग्रीन अशा अनेक कंपन्यांनी फसवणूक केली आहे. आपणाला या कंपन्यांच्या माध्यमातून एक दिवस तरी लाखो, करोडो रुपये मिळतील. ही भाबडी आशा प्रत्येकवेळी उराशी बाळगून येथील तरुणांनी आपल्या अशिक्षित व सुशिक्षित बेकारीवर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आताही पुन्हा हेच प्रकार दिसत आहेत.
सध्या जिल्ह्यात अशाच एका मार्केटिंग कंपनीचा नाव बदलून गोंडस कारभार सुरु आहे. गुंतवणूकदारांना २०० रुपयांत आलिशान चारचाकी गाडी देण्याचे स्वप्न दाखवले जात आहे. दर महिन्याला दोनशे रुपये भरा व तुमचे नशीब आजमावून बघा, असा फंडाच या कंपनीने सुरु केला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या लॉटरीसदृश मार्केटिंग कंपनीचा कारभार सर्वत्र बिनदिक्कतपणे सुरु आहे. केवळ दोनशे रुपयांत लाखोंचे बक्षीस देणाऱ्या कंपनीचे शेकड्यानी दलाल गावोगावी फिरताना दिसून येत आहेत.
लॉटरीचे नाव काढताच अनेक दलालानी भाबड्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी गरीब जनता त्यांच्या आमिषाला बळी पडत आपल्या रोजच्या खर्चातील महिन्याकाठी दोनशे रुपये या लॉटरीच्या हव्यासापायी गुंतवत आहे. कधी एकदा ड्रॉ काढला जातो व आपल्याला काय लागते, याच्या प्रतीक्षेत अनेकजण असल्याचे दिसून येते. या दलालानी अनेकांना आपल्या जाळ्यात ओढताना भलीमोठी बक्षिसांची यादीही सादर केलेली असते. त्यामुळे किमान एक हजार रुपयांची तरी बक्षिसी मिळेल, या आशेवर अनेकजण पैसे गुंतवताना दिसून येत आहेत. सध्या या कंपनीने संपूर्ण जिल्ह्यात प्रतिमहा दोनशे रुपयांचे सुमारे पन्नास ते साठ हजार ग्राहक जमवले आहेत. त्या माध्यमातून करोडो रुपयांची माया जमवली आहे.
यावेळी तुम्हाला बक्षीस लागले नाही तरी पुढच्या वेळी लागेल. त्यावेळी लागले नाही, तर वर्षभरात नक्कीच बक्षीस लागेल. ते तुम्ही गुंतवलेल्या रकमेपेक्षा नक्कीच मोठे असेल, असे आमिष दाखवण्यात येत आहे. आतापर्यंत या कंपनीच्या चालकांनी जिल्हाभरात करोडो रुपयांची उलाढाल केली आहे. त्यामुळे येथील गोरगरीब जनतेची होणारी फसवणूक टाळण्यासाठी या कंपनीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

Web Title: Marketing again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.