मार्लेश्वर-गिरिजादेवीचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, भाविकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 06:54 PM2024-01-15T18:54:33+5:302024-01-15T18:54:42+5:30
सचिन मोहिते देवरूख: राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील स्वयंभू मार्लेश्वर तीर्थक्षेत्री चि. मार्लेश्वर आणि चि.सौ.का. ...
सचिन मोहिते
देवरूख: राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील स्वयंभू मार्लेश्वर तीर्थक्षेत्री चि. मार्लेश्वर आणि चि.सौ.का. गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) सोमवारी दुपारी हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला. या विवाह सोहळा प्रसंगी भाविकांनी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री मोठी गर्दी होती. विवाहसोहळा संपन्न होताच उपस्थित भाविकांनी हर हर मार्लेश्वरचा जयघोष करत सह्याद्रीच्या पर्वतरांगा दणाणून सोडल्या.
मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी दि.१२ ते १८ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. मार्लेश्वरचा हा वार्षिक यात्रोत्सव सुप्रसिद्ध आहे. दि. १२ रोजी आंगवली मठात प्रथेप्रमाणे मार्लेश्वर देवाचा मांडव घालून या यात्रोत्सवाची सुरूवात झाली. दि.१३ रोजी रात्री आंगवली मठात मार्लेश्वर देवाला हळद लावण्यात आली व घाणा भरण्यात आला. दि. १४ रोजी सायंकाळी मठात यात्रा, दिंड्या, कावड, पालख्यांचे आगमन, कल्याणपुर्व विधी व रात्री १२ वा. मार्लेश्वर पालखीचे शिखराकडे प्रस्थान झाले. याअगोदर देवरूखच्या व्याडेश्वराची पालखी, आंबव व लांजा येथील दिंड्या तर वांझोळेची कावड या सर्वांनी पवईला जाण्यासाठी प्रयाण केले. पवईतून मार्लेश्वराची पालखी, यजमान व्याडेश्वराची पालखी, दिंड्या व कावड या सर्वांनी शिखराकडे प्रस्थान केले.
याअगोदर साखरप्याची गिरिजादेवीची पालखी शिखरावर पोहचली होती. सर्वजण शिखरावर पोहचल्यानंतर सोमवारी सकाळी मुलगी पाहणे, मुलाचे घर पाहणे, मागणी टाकणे, पसंती करणे, मानपान असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानंतर मार्लेश्वर-गिरिजादेवीच्या लग्नाचा मुहुर्त काढण्यात आला. प्रत्यक्षात विवाहसोहळ्याला सुरूवात होण्यापुर्वी रायपाटणकर स्वामी व लांजेकर स्वामी यांना मंदिराजवळ आणण्यात आले. त्यांची पाद्यपूजा झाल्यावर त्रिपूर उजळण्यात आला. यानंतर विवाहसोहळ्याला सुरूवात होण्यापुर्वी तब्बल ३६० मानकऱ्यांना विवाहाचे अगत्यपुर्वक निमंत्रण देण्यात आले. लिंगायत धर्मिय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करून विवाहसोहळ्याला मंत्रघोषात प्रत्यक्षात प्रारंभ करण्यात आला. दुपारी १ वाजण्याच्या मुहुर्तावर मंगलाष्टकांनी विवाहसोहळा संपन्न झाला.
या विवाहसोहळ्याला आमदार शेखर निकम, ठाकरे गटाच्या संपर्क संघटक नेहा माने, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, परशुराम कदम, युवासेनेचे राज्य सहसचिव प्रद्युम्न माने, भाजपाचे प्रमोद अधटराव, संतोष केदारी, बापू शेट्ये, तहसिलदार अमृता साबळे उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलिस निरिक्षक प्रदीप पोवार यांच्यासह पोलिस फाटा तैनात होता.