सामुहिक अत्याचार प्रकरणातील संशयित निर्दोष; सहा वर्षापूर्वीची घटना
By अनंत खं.जाधव | Published: March 30, 2024 11:35 PM2024-03-30T23:35:45+5:302024-03-30T23:37:19+5:30
सावंतवाडी रेल्वेस्थानकावर घडला होता प्रकार : सहा वर्षापूर्वीची घटना
सावंतवाडी : गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याच्या घटनेतील रामचंद्र अंकुश घाडी (रा.आकेरी), राकेश कृष्णा राऊळ व प्रशांत कृष्णा राऊळ दोघेही (रा. मळगाव) या संशयित आरोपींची जिल्हा विशेष न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.ही घटना 21 फेब्रुवारी 2018 रोजी सावंतवाडी येथील रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्मवर घडली होती.
सावंतवाडी मळगाव येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार प्रकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलेच गाजले होते. यात सावंतवाडी रेल्वेस्थानक परिसरात अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिघा संशयित आरोपींन मुलीवर सामूहिक अत्याचार केला होता. याप्रकरणी संबंधित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.यात फिर्यादी अल्पवयीन मुलीस संशयितातील एकाने तिचा प्रियकर आहे, हे तिच्या घरच्यांना सांगेन अशी धमकी देऊन तिला घरी सोडतो, असे सांगून जबरदस्तीने सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळील एका लॉजवर नेले होते. तेथे तिला गुंगीचे औषध घालून पाणी प्यायला दिले होते.त्यानंतर गुंगी आल्यावर तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले तसेच तिला लॉजवरुन बाहेर पडल्यानंतर रेल्वेस्टेशनजवळ उभ्या असणाऱ्या अन्य दोघांनी ५० रुपये घेऊन फिर्यादीस त्यांच्या ताब्यात दिले.
फिर्यादीने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला असता दोघांनी तिला पाणी प्यायला दिले व तिला गुंगी आल्यावर जबरदस्तीने रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वरील शेडवर नेले व त्या दोघांनी देखील शारीरिक संबंध ठेवले, अशी फिर्याद सावंतवाडी पोलीस ठाणे येथे देण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली होती.सध्या ते न्यायालयीन कोठडीत होते. याकामी अॅड विवेक मांडकुलकर व अॅड संग्राम देसाई, अॅड भुवनेश प्रभू खानोलकर, अविनाश परब सुहास साटम आदींनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष न्यायाधीश एस. एस. जोशी यांनी तिघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
तब्बल सहा वर्षानंतर संशयित येणार बाहेर
सावंतवाडी येथील रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्या प्रकरणातील संशयित अटकेनंतर येथील कारागृहात होते. आता या प्रकरणी न्यायालयाकडून या तिघांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर ते तब्बल सहा वर्षानंतर बाहेर येणार आहे.