रत्नागिरी : मासरंग धनगरवाडीचे होणार पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 02:05 PM2018-12-11T14:05:41+5:302018-12-11T14:16:46+5:30
मासरंग धनगरवाडीतील कुटुंबांचे सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश वायकर यांनी देवरूख तहसीलदारांना दिले आहेत.
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मासरंग धनगरवाडीसारख्या अनेक वाड्या या डोंगराळ भागात वसल्या आहेत. ज्या वाड्या विकासापासून वंचित आहेत, अशा दुर्गम वाड्यांचे पुनर्वसन करण्याचा पालकमंत्री रवींद्र वायकर यांचा मानस आहे. त्यादृष्टीने मासरंग धनगरवाडीतील कुटुंबांचे सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश वायकर यांनी देवरूख तहसीलदारांना दिले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील मासरंग व निवळी धनगरवाडीला जोडणाऱ्या रस्त्याला पालकमंत्री वायकर यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करुन दिला होता. या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी पालकमंत्री वायकर हे मासरंग धनगरवाडीत आले होते. यावेळी वायकर हे मासरंग धनगरवाडीपर्यंतचा खडतर प्रवास करुन भूमिपूजनाठिकाणी पोहोचले.
आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य पोहोचू शकले नाहीत अशा या दुर्गम वाडीत पालकमंत्री वायकर पोहोचल्याने वाडीतील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. पालकमंत्र्यांच्या भेटीने धनगरवाडीतील ग्रामस्थ भारावून गेले होते. यावेळी वायकर यांनी स्थानिकांशी मनमोकळी चर्चा केली.
मासरंग - धनगरवाडी रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती सहदेव बेटकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, पंचायत समिती सभापती सोनाली निकम, जिल्हा नियोजन समिती सदस्य तुकाराम येडगे, संतोष येडगे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, तहसीलदार संदीप कदम, संगमेश्वर धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम शेळके, कनिष्ठ अभियंता जाधव, शिवसेना विभागप्रमुख जयवंत बने, कडवईचे सरपंच वसंत उजगावकर यांच्यासह संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.