आसोली-वडखोल येथे शॉर्टसर्किटमुळे भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 03:14 PM2021-01-27T15:14:43+5:302021-01-27T15:16:36+5:30
Fire Vengurla Sindhudurg- वेंगुर्ला तालुक्यातील आसोली-वडखोल सड्यावर सुमारे दहा हेक्टर क्षेत्रात लागलेल्या भीषण आगीत आंबा-काजू बागायतींचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सोमवारी भर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. दरम्यान, ग्रामस्थांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. यावेळी या ठिकाणी आलेल्या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी धारेवर धरले.
वेंगुर्ला : तालुक्यातील आसोली-वडखोल सड्यावर सुमारे दहा हेक्टर क्षेत्रात लागलेल्या भीषण आगीत आंबा-काजू बागायतींचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सोमवारी भर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. दरम्यान, ग्रामस्थांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. यावेळी या ठिकाणी आलेल्या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी धारेवर धरले.
आसोली गावातील वडखोल-धनगरवाडी सडा परिसरात सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या ठिकाणी परिसरात मोठ्या प्रमाणात सुका चारा असल्यामुळे ही आग पुढे पुढे पसरत जाऊन रौद्ररूप धारण केले. तर या ठिकाणी असलेल्या शेतकरी सुरेश अंकुश नेरुरकर, तानाजी गोपीनाथ गावडे, संजय सहदेव गावडे या ग्रामस्थांसह आंबा, काजू बागेसहीत बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान यामुळे झाले आहे. या आगीने मुख्य ठिकाणांसह पाल, फणसखोल, मातोंड आदी जंगल परिसराला विळखा घातला. याबाबतची माहिती मिळताच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली.
दरम्यान, गुरुवारी २८ जानेवारी रोजी याबाबत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची बैठक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वेंगुर्ला येथील वीज वितरण कार्यालयात घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. आसोली-पाल तलाठी धुमाळे, पोलीस पाटील निलेश पोळजी, ग्रामसेवक डी. व्ही. पोवार, कृषी सहायक प्रियांका देऊलकर यांनी पंचनामा केला.
यावेळी पंचायत समिती माजी सभापती तथा विद्यमान सदस्य सुनील मोरजकर, सामाजिक कार्यकर्ते कमलेश गावडे, ग्रामस्थ रामदास परब, राजेंद्र गावडे, अशोक धाकोरकर, सुरेश नाईक, कमलाकर नाईक, गणपत आमडोस्कर, संदीप नाईक, योगेश कोळसुलकर, सूचिता नाईक, तानाजी गावडे, आनंद गावडे, मधुकर गावडे, गोपीनाथ गावडे, ओंकार गावडे, सूर्याजी गावडे, राजन गावडे व इतर उपस्थित होते.
ग्रामस्थांनी घेतला आक्रमक पवित्रा
गेली ७ वर्षे असाच प्रकार सातत्याने घडत आहे. यावर कोणताही तोडगा वीज वितरणकडून काढला जात नाही. वीज वितरणचे सहायक अभियंता अशोक चव्हाण, शाखा अभियंता मुळे यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी याठिकाणी येऊन उपाययोजनेबाबत ठोस लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत येथून जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.