मतदान यंत्रासहित साहित्य मतदान केंद्रांवर रवाना, कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान
By सुधीर राणे | Published: December 17, 2022 12:28 PM2022-12-17T12:28:15+5:302022-12-17T12:28:50+5:30
तालुक्यातील ५८ पैकी सहा ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. तर ९ सरपंच बिनविरोध झाले आहेत.
कणकवली: कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या व ४९ सरपंचपदासाठीची निवडणुकीसाठी उद्या, रविवारी (दि.१८) मतदान होत आहे. यासाठी मतदान अधिकाऱ्यांसहीत पोलिस व शिपाई मिळून ९९६ अधिकारी, कर्मचारी तसेच ६८ राखीव कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोहोच करण्यासाठी १३ एसटी बसेस व ४ टेम्पो ट्रॅव्हलर तैनात असून आज, शनिवार सकाळपासून साहित्य वितरण सुरू करण्यात आले. मतदान यंत्रासह साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.
कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, निवासी नायब तहसीलदार शिवाजी राठोड, नायब तहसीलदार प्रिया परब तसेच मंडल अधिकारी, तलाठी, निवडणूक निर्णय अधिकारी, ग्रामसेवक व इतर खात्यांचे कर्मचारी, शिक्षक आदी यासाठी तैनात आहेत. तालुक्यातील ५८ पैकी सहा ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. तर ९ सरपंच बिनविरोध झाले आहेत.
५२ ग्रामपंचायती व ४९ सरपंचपदासाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी १६६ मतदान केंद्रावर निवडणूक होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक पोलीस व एक शिपाई असे कर्मचारी तैनात असणार आहेत. याशिवाय सहा झोनल अधिकारीही तैनात आहेत.
कणकवली तहसील कार्यालयातून आज, सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास कलमठ मतदान केंद्रावर साहित्य व कर्मचाऱ्यांना घेऊन पहिली बस रवाना झाली. तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ही बस रवाना करण्यात आली.