ड्रग्स माफियांच्या सर्वात जवळचा मोठा मित्र मातोश्रीवर, नितेश राणेंचा गंभीर आरोप
By सुधीर राणे | Published: October 19, 2023 04:23 PM2023-10-19T16:23:19+5:302023-10-19T16:25:18+5:30
एकनाथ शिंदेनी 'तो' नवस पूर्ण केला
कणकवली: ललित पाटील जेव्हा तोंड उघडेल तेव्हा ठाकरे सेनेचे अनेक नेते जेलमध्ये असतील. त्यामुळे नाशिकमध्ये मोर्चा काढण्यापेक्षा एक मोर्चा मातोश्री वर काढावा. कारण ड्रग्स माफियांच्या सर्वात जवळचा मोठा मित्र मातोश्रीवर आहे. असा आरोप करतानाच मतांच्या राजकारणासाठी संजय राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. मात्र, त्यांची पंतप्रधानावर बोलण्याची पात्रता नाही अशी टीका भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
'..याचाच अर्थ जिहादी, धर्मांध दहशतवाद्यांना त्यांचे समर्थन'
कणकवली येथे गुरुवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राईलच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यावर शरद पवारांनी टीका केली आहे. १९९३ च्या दंगलीच्या काळात दहशदवादी काय करु शकतात, हे शरद पवार यांना माहीत असताना फ़क्त मतांसाठी राजकारण करणे योग्य नाही. देशाची आणि जगाची सुरक्षा महत्वाची आहे. हमासने हल्ला केला त्याचा निषेध करताना आम्ही ठाकरे, पवारांना कधी पाहिले नाही. याचाच अर्थ जिहादी आणि धर्मांध दहशतवाद्यांना त्यांचे समर्थन आहे. अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांना ते पाठिंबा देत आहेत. उद्या ओवेसीच्या रॅलीत उद्धव ठाकरे खांद्याला खांदा लावून सहभागी झाले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. एवढे हे मतांसाठी स्वतःचे विचार विसरलेले आहेत.
एकनाथ शिंदेनी 'तो' नवस पूर्ण केला
माँ साहेबांनी बोललेला नवस उद्धव ठाकरेंनी पूर्ण केला नाही. तर एकनाथ शिंदेनी तो नवस पूर्ण केला. याबाबत राऊत यांनी बोलावे. आरोप झाल्यावर राजीनामा द्यायचा तर सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा राजीनामा का घेतला नाही? आमच्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार ठाकरे सेनेच्या नेत्यांना नाही.
..तर काँग्रेसवाल्यांनी विजेचा वापर करू नये
निष्ठावंत काँग्रेसवाल्यांनी राहुल गांधींच्या आदेश प्रमाणे विजेचे बटन सुरू करू नये. जो विजेचे बटन ऑन करेल तो काँग्रेसचा नेता, कार्यकर्ता नाही. वीज सुरू केल्यामुळे अदाणीला पैसे जाणार असतील तर काँग्रेसवाल्यांनी विजेचा वापर करू नये. त्यांनी राहुल गांधींच्या आदेशाचे पालन करावे. ठाकरे शिवसेना कार्यकारिणीमध्ये आता निष्ठावाण उरलेले नाहीत अशी टीका यावेळी राणे यांनी केली.