कणकवलीत सर्वाधिक ३२ मिलीमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:52 IST2021-06-09T18:50:28+5:302021-06-09T18:52:09+5:30
Rain Sindhudurg : कणकवली तालुक्यात चौविस तासात जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मृग नक्षत्राचे जणू स्वागत करीत सकाळपासूनच कणकवली शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.

कणकवली शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली.
कणकवली : कणकवली तालुक्यात चौविस तासात जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मृग नक्षत्राचे जणू स्वागत करीत सकाळपासूनच कणकवली शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. कणकवली तालुक्यात गेले दोन दिवस कमी जास्त प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत ४४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद येथील तहसील कार्यालयात झाली आहे.
सध्या भात शेतीसाठी पूरक पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भात पेरणीच्या कामात गुंतला आहे. काही ठिकाणी भात पेरणी पूर्ण झाली आहे. गेले दोन दिवस पाऊस पडत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ॉमंगळवारी दिवसभर कणकवली शहरात पाऊस पडत होता. मंगळवारी सकाळपासून बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने विक्रेते तसेच नागरिकांची तारांबळ उडाली होती.
सखल भागात पाणी
कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाआंतर्गत सर्व्हिस रस्ते तयार करण्यात आले आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते. मधूनच एखादे वाहन जोरात रस्त्यावरून गेल्यास चिखलयुक्त पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत होते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.