आचऱ्यात जन्म झाल्याचे सार्थक
By admin | Published: December 23, 2014 10:17 PM2014-12-23T22:17:20+5:302014-12-23T23:43:40+5:30
विद्याधर करंदीकर : ‘क्षण आनंदाचे, दिवस गावपळणीचे’ छायाचित्र प्रदर्शन
आचरा : आचरावासीयांच्या एकजुटीला मनापासून धन्यवाद देतो. गावपळणीविषयक अनेक चांगल्या संकल्पनांची येथे चर्चा झाली. आपला जन्म आचऱ्यात झाल्याने सार्थकी लागल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विद्याधर करंदीकर यांनी बोलताना व्यक्त केले.
डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘क्षण आनंदाचे दिवस गावपळणीचे’ हा आचरा गावपळणीवर आधारीत छायाचित्र प्रदर्शन व शब्दचित्र संमेलन अशा स्वरूपाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, पत्रकार महेश सरनाईक, संतोष वायंगणकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, चंद्रकांत सामंत, कवी व साहित्यिक मधुसुदन नानिवडेकर, आचरा सरपंच मंगेश टेमकर, पोलीस ठाण्याचे महेंद्र शिंदे, नंदकिशोर महाजन, भरत जोशी आदी उपस्थित होते. गावातील गावपळणीची मजा लुटलेल्या साटम यांनी त्यांनी अनुभवलेली गावपळण ग्रामीण बोलीभाषेतील ओव्या म्हणून व्यक्त केल्या. राजू केळकर यांनी आपल्या ९५ वर्षाच्या वयोवृद्ध आजीची गोष्ट सांगितली. विलास सक्रू यांचे मालवणी काव्य भाव खाऊन गेले. संस्थेचे महालदार अरविंद सावंत यांनी गावपळणीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाशझोत टाकला. आचरा गावातील जगन्नाथ भावे, मुकुंद घाडी, निकिता कांबळी, अनिल करंजे आदींनी आपण अनुभवलेली गावपळण आपल्या मनोगतातून व्यक्त केली. दुसऱ्या सत्रामध्ये महेंद्र पराडकर, अमित खोत, प्रफुल्ल देसाई, भूषण मेथर, कृष्णा ढोलम आदींनी गावपळणीचे वृत्तांकन करताना त्यांना आलेले अनोखे अनुभव कथन केले. पत्रकारांच्या सहकार्याने ही गावपळण योग्यतऱ्हेने सर्वदूर पोहोचली, याकरिता पत्रकारांचे आभार मानण्यात आले. गावपळण कार्यक्रमामध्ये आपले कर्तव्य बजावताना खाकीवर्दीतील माणुसकी जपणाऱ्या आचरा पोलीस ठाण्याच्या महेंद्र शिंदे यांची आपण आचरा गावपळण अनभवून धन्य झाल्याचे मत व्यक्त केले. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध धर्माचे सर्व आचरावासीय गावपळणीत गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे प्रतिपादन जुबेर काझी व लक्ष्मण आचरेकर यांनी केले. आचरा गावची एकता कशी अबाधित आहे, याचे प्रत्यंतर आपल्या मनोगतातून दाखविले. सूत्रसंचालन सुरेश ठाकूर यांनी केले. (वार्ताहर)