मेढा ग्रामपंचायत खर्च संशयास्पद

By admin | Published: August 16, 2016 10:27 PM2016-08-16T22:27:07+5:302016-08-16T23:00:50+5:30

वादाच्या भोवऱ्यात : खातेनिहाय चौकशीची मागणी

Medha Gram Panchayat expenditure is suspicious | मेढा ग्रामपंचायत खर्च संशयास्पद

मेढा ग्रामपंचायत खर्च संशयास्पद

Next

म्हापण : सन २0१५-१६ मध्ये वेंगुर्ले तालुक्यातील मेढा ग्रामपंचायतीचा जो खर्च दाखविण्यात आला आहे. तो संशयातीत असल्याने १५ आॅगस्टच्या ग्रामसभेने हा खर्च अमान्य करून याला सर्वस्वी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य जबाबदार असल्याने या खर्चाची खातेनिहाय चैकशी करण्यात यावी तसेच दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी असा महत्वपूर्ण ठराव ग्रामसभेने बहुमताने मंजूर केल्याने पूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात असलेली मेढा ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
१५ आॅगस्टची वार्षिक ग्रामसभा विठोबा कोचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामसेवक चव्हाण यांनी उपस्थित ग्रामस्थांचे स्वागत करून मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करताना सन २0१५-१६ चा तत्कालीन ग्रामसेवक तुषार हळदणकर यांनी मांडलेला खर्च सभेपुढे ठेवला असता त्यातील काही आक्षेपार्ह बाबींमुळे तो अमान्य करून त्याला जबाबदार असणारे ग्रामसेवक तुषार हळदणकर, सरपंच व सदस्य यांची खातेनिहाय चैकशी करण्यात यावी असा महत्वपूर्ण ठराव करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच गौतम मालंडकर हे गेली सुमारे दोन वर्षे ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सभेला उपस्थित नसताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी त्यांच्या घरी जावून डिसेंबर २0१५ अखेर त्यांच्या सह्या प्रोसिडींगवर घेणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवकांवर कारवाई करणे, ग्रामपंचायतीच्या कार्यकक्षेतील निवती बंदर ते पवार घर रस्त्याच्या दुतर्फा झाडी तोडणे, निवतीबंदर एस. टी. थांब्यावरील धोकादायक सुरुंची झाडे तोडणे, मेढा व श्रीरामवाडीतील सार्वजनिक शौचालये व अंगणवाड्यांची दुरूस्ती करणे, मेढा व श्रीरामवाडीतील धोकादायक बनलेल्या वीजवाहिन्या बदलणे, मेढा व श्रीरामवाडीचा जलशिवार योजनेत समावेश करणे, मेढा गावात दारूबंदी करणे, मेढावाडीतील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बंदीस्त गटार बांधणे आदी महत्वपूर्ण ठराव घेण्यात आले. (प्रतिनिधी)


ग्रामस्थ नाराज : ग्रामपंचायत बरखास्तीची मागणी
यापूर्वीच्या ग्रामसभेने घेतलेल्या ग्रामपंचायत बरखास्तीच्या ठरावाची कोकण आयुक्तांकडून चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
पण आता तीन ते चार महिने उलटूनही त्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याबद्दल ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर निर्णय घेऊन ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सभा संपेपर्यंत ग्रामस्थांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर सरपंच आरती कुडाळकर यांनी दिले नाही.
सभा संपल्याचे जाहीर करण्यापूर्वीच सरपंच व काही सदस्य सभागृहातून निघून गेले होते. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत होता.

Web Title: Medha Gram Panchayat expenditure is suspicious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.